scorecardresearch

“राज ठाकरे भाजपाचा अनधिकृत भोंगा”; औरंगाबादच्या सभेत राज ठाकरेंना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा

राज ठाकरे यांचे विधान दोन समाजात तेढ निर्माण करणारे असल्याचा आरोप करण्यात आलाय.

BJP MNS Pune
राज ठाकरेंच्या भूमिकेचा केला विरोध (फाइल फोटो)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याची भुमिका घेतली आहे. त्या भूमिकेचा आम्ही निषेध व्यक्त करीत असून एक मे रोजी औरंगाबाद येथील राज ठाकरे यांच्या सभेत आम्ही काळे झेंडे दाखविणार असल्याचा इशारा सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाकडून देण्यात आला आहे. पुण्यामधील पत्रकार परिषदेत अशोकराव जाधव,अजहर तांबोळी आणि ताज सिद्दीकी यांनी भूमिका स्पष्ट केली.

मुस्लिम समाजाला आजपर्यंत प्रत्येक वेळी आरोपीच्या पिंजऱ्यात बघितले आहे, हे अनेक घटनांमधून समोर आले आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगा काढले नाही तर आम्ही तिथे हनुमान चालीसा लावून असे विधान केले. त्याही पुढे जाऊन आम्हाला तीन तारखेपर्यंत मुदत दिली आहे. हे आम्हाला मान्य नसून राज ठाकरे यांचे विधान दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहेत. राज ठाकरे यांच्या पाठीमागून भाजपा ही खेळी खेळत असून राज ठाकरे हे भाजपाचे अनाधिकृत भोंगा आहे. त्यामुळे त्यांनी यावर बोलूच नये. पण आम्ही या विरोधात सनदशीर मार्गाने उत्तर देऊ, असं डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने सांगितलंय.

“आजवर आपण सर्व सण उत्सव गुण्यागोविंदाने साजरे केले आहेत. तसेच या पुढे देखील साजरे करुयात. जर राज ठाकरे यांनी हाच मुद्दा कायम ठेवल्यास भविष्यात वर्षभरात येणार्‍या सणांमध्ये भोंग्यांचा वापर होण्याचा मुद्दा देखील पुढे येईल, त्यामुळे राज ठाकरे यांनी यावर बोलण्यापेक्षा सर्व सामन्याच्या प्रश्नावर बोलावे, अन्यथा औरंगाबाद येथे होणार्‍या राज ठाकरेच्या सभेत आम्ही काळे झेंडे दाखवू, असा सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियामार्फत देण्यात आला.

तसेच राज्यात यावर मोठ्या प्रमाणावर राजकारण सुरू आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये राजकीय मंडळीकडून इफतार पार्टीचे आयोजन करण्यात येत आहे. त्यावर मुस्लिम समाजातील प्रत्येकाने बहिष्कार टाकण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sdpi says will block road of mns chief raj thackeray svk 88 scsg

ताज्या बातम्या