सात-बारा, लीझ अॅग्रीमेंट अशा विविध दाखल्यांबरोबरच खरेदी-विक्री व्यवहारही १ एप्रिल २०१५ पासून ऑनलाईन पध्दतीने होतील व जनतेला महसूल विभागाकडील विविध दाखले ऑनलाईन पध्दतीने घरबसल्या मिळू शकतील. ई-गव्हर्नन्स पध्दतीवर भर देऊन महसूल विभाग अधिक गतिमान व पारदर्शी करण्याचा शासनाचा मानस आहे, असे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी भोर येथे जाहीर केले.
राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत भोर तालुका ई-फेरफार योजनेची सुरुवात महसूल मंत्री खडसे यांच्या हस्ते झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे हेही उपस्थित होते.
‘सात-बाराच्या उताऱ्यांसाठी कायद्यात सुधारणा’
न्यायालय, बँक, विमा आदी प्रकरणात सात-बाराचा उतारा आणण्याची अट आवश्यक असते, असे सांगून खडसे म्हणाले की, आता राज्यातील सर्व तालुक्यात ई-चावडी, ई-फेरफार योजनांद्वारे सर्व ठिकाणी महसूल विभागात ई-गव्हर्नन्स राबविण्यात येत आहे. यामुळे सात-बाराचा ऑनलाईन उतारा उपलब्ध होणार आहे. यासाठी न्यायप्रक्रियेसह सर्व ठिकाणी सात-बाराचा उतारा ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्याबाबत कायद्यात लवकरच दुरुस्ती करण्यात येईल. काही महिन्यातच सॅटेलाईटद्वारे जमिनीची मोजणी पूर्ण करण्यात येणार असून येत्या तीन वर्षांत हा उपक्रम पूर्ण करून त्यापुढे शेतकरी तसेच सर्वसामान्यांना जमिनींचे नकाशे सुध्दा ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध होतील.
‘भोर महसूल भवनासाठी पाच कोटी रुपये’
अतिशय दुर्गम व भौगोलिकदृष्टय़ा विकसित असलेल्या तालुक्यातील जनतेने यासाठी सहकार्य केले याबद्दल भोर तालुकावासीयांचे त्यांनी आभार मानले आणि आमदार संग्राम थोपटे यांच्या विविध मागण्यांना उत्तर म्हणून भोर येथे प्रशासकीय इमारतीसाठी विशेष बाब म्हणून पाच कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. भाटघर धरणग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लक्ष घालून प्रयत्न करेन, असेही खडसे म्हणाले.
जमाबंदी आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी ई-चावडी व ई-फेरफार योजनेसंदर्भात माहिती दिली. आमदार संग्राम थोपटे, नोंदणी महानिरीक्षक श्रीकर परदेशी, जिल्हाधिकारी सौरभ राव, उपजिल्हाधिकारी रामदास जगताप, भोर पंचायत समितीच्या सभापती नंदाताई शेडगे हेही या वेळी उपस्थित होते. खडसे यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तलाठय़ांचा गौरव करण्यात आला. त्यात के.के.पाटील, एच. एल. नायकवडी, एम.आर. थोपटे, एस.डी. तेलंग, श्रीमती एस.व्ही. जाधव, श्रीमती पद्मा जाधव यांचा समावेश होता.
संग्रहित लेख, दिनांक 1st Feb 2015 रोजी प्रकाशित
खरेदी-विक्री व्यवहारांचे दाखलेही आता घरबसल्या मिळणार
सात-बारा, लीझ अॅग्रीमेंट अशा विविध दाखल्यांबरोबरच खरेदी-विक्री व्यवहारही १ एप्रिल २०१५ पासून ऑनलाईन पध्दतीने होतील व जनतेला महसूल विभागाकडील विविध दाखले ऑनलाईन पध्दतीने घरबसल्या मिळू शकतील.
First published on: 01-02-2015 at 02:58 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sell purchase certificate in house