पुणे :ज्येष्ठ नागरिकाकडे बतावणी करुन चोरट्यांनी सोनसाखळी लांबविल्याची घटना पाषाण-सूस रस्त्यावर घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिक पाषाण-सूस रस्त्यावरील पदपथावरुन निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना अडवले. ‘क्या अंकल किधर है, बहोत दिन हो गये मिले नही’,अशी विचारणा चाेरट्यांनी केली. त्यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी चोरट्यांकडे ओळख विचारली. तेव्हा दुचाकीवरील एक चोरटा उतरला आणि त्याने ज्येष्ठ नागरिकाच्या पाया पडण्याचा बहाणा केला.

‘आम्हाला मंदिरात दान करायचे आहे’, असे सांगून चोरट्याने त्यांना बिस्किटचा पुडा दिला. त्यावेळी ज्येष्ठ नागरिकाने चोरट्यांना जाण्यास सांगितले. चोरट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतवून नकळत त्यांच्या गळ्यातील एक लाख २० हजारांची सोनसाखळी काढून घेतली आणि चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. काही वेळानंतर गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी लांबविल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

ज्येष्ठ नागरिकाकडे बतावणी करून चोरट्याने त्यांच्याकडील ७८ हजार रुपयांची सोन्याची अंगठी लांबविल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात नुकतीच घडली. शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पादचारी ज्येष्ठांना अडवून चोरटे बतावणी करतात. त्यांच्याकडील दागिने, रोकड लांबवून चोरटे पसार होतात. पोलीस असल्याची बतावणी, ज्येष्ठांना मोफत धान्यवाटप, महिलांना साडीवाटप अशा प्रकारची बतावणी केली जाते. बतावणी करणाऱ्या चोरट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. बतावणी करणारे चाेरटे दिसल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी किंवा पोलीस नियंत्रण कक्षात (११२) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.