पुणे : एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाची चोरट्याने ४० हजारांची फसवणूक केल्याची घटना शंकशेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौकात घडली. याप्रकरणी खडक पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ नागरिक नाना पेठेत राहायला आहेत. ते बुधवारी (२ जुलै) शंकरशेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौकातील (सेव्हन लव्हज चौक) एका बँकेच्या एटीएमध्ये दुपारी गेले होते.
एटीएममध्ये एक चोरटा त्यांच्या पाठोपाठ शिरला. पैसे काढणाऱ्या ज्येष्ठाकडे मदतीचा बहाणा केला. त्यांच्याकडून डेबीट कार्ड आणि सांकेतिक शब्द घेतला. ज्येष्ठाच्या डेबीट कार्डचा वापर न करता. चोरट्याने त्याच्याकडील डेबीट कार्ड वापरले. पैसे न बाहेर पडल्याने चोरट्याने तांत्रिक बिघाड असल्याची बतावणी केली. त्यानंतर चोरट्याने त्याच्याकडील डेबीट कार्ड ज्येष्ठ नागरिकाला दिले. पैसे न मिळाल्याने ते घरी गेले.
काही वेळानंतर त्यांच्या खात्यातून ४० हजारांची रोकड लांबविण्यात आल्याचे उघडकीस आले. चोरट्याने ज्येष्ठाच्या डेबीट कार्डचा वापर करुन खात्यातून पैसे लांबविल्याचे आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी एटीएम परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, सहायक पोलीस निरीक्षक वळसंग तपास करत आहेत.
शहर परिसरात एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. वारजे, रास्ता पेठ, खडकी भागात एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांकडे बतावणी करुन चोरट्यांनी रोकड लांबविल्याची घटना घडली हाेती. पोलिसांनी याप्रकरणी तपास करुन उत्तर प्रदेशातील चोरट्यांना अटक केली होती.