वाहन चालक, दुभाजकामुळे रस्ता ओलांडता येत नाही.. पदपथ तिरका असल्याने व्यवस्थित चालता येत नाही.. अशा काही तक्रारींबरोबरच मुले मालमत्ता नावे करून मागतात व पेन्शनही घेतात.. सून वेळेवर जेवणही देत नाही, अशा काही गंभीर तक्रारी व घरातून होणाऱ्या त्रासांचा पाढा ज्येष्ठ नागरिकांनी शुक्रवारी पोलिसांसमोर वाचला. पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये ज्येष्ठांच्या अडीअडचणी समजावून घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात ज्येष्ठ नागरिकांनी मनमोकळेपणे त्यांच्या तक्रारी मांडल्या.
पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. त्या पाश्वभूमीवर हा कार्यक्रम घेण्यात आला. असोसिएशन ऑफ सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन ऑफ पुणे, गोल्डन एर्नजायर, अथश्री फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसह शहरातील विविध भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमात विविध सेवा, पालिका, वाहतूक आदींसह घरगुती समस्याही मांडल्या.
रस्त्या ओलांडताना दुभाजकाचा त्रास होतो. गॅस एजन्सीकडून वेळेवर सिलिंडर मिळत नाही. भटक्या कुत्र्यांचा त्रास होतो. इलेक्ट्रॉनिक वस्तू वेळेवर दुरुस्त करून मिळत नाहीत. या तक्रारींसह मुलांकडून पेन्शनबाबत होणारी मागणी, मालमत्ता नावावर करून देण्यासाठी आणला जाणारा दबाव व सुनेकडून होणाऱ्या त्रासाच्या तक्रारीही ज्येष्ठ नागरिकांनी मांडल्या. पोलिसांकडून घेतल्या जात असणाऱ्या माहितीमध्ये घरगुती स्वरुपाच्या इतर अनेक तक्रारी नोंदविल्या जात आहेत.
पोलीस आयुक्त के. के. पाठक यांनी या सर्व तक्रारी समजावून घेतल्या. पालिका किंवा वाहतूक पोलिसांशी संबंधित असणाऱ्या तक्रारी तातडीने सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ज्येष्ठांच्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी पोलीस कटिबद्ध असून, प्रत्येक पोलीस ठाण्यात ज्येष्ठांच्या अडचणी सोडविण्यासाठी एका स्वतंत्र पथकाची स्थापना करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्याच्या पथकाकडून परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचा अर्ज भरून घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गस्तीच्या दरम्यान ज्येष्ठांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेण्याच्याही सूचना करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
ज्येष्ठांना काही अडचणी असल्यास त्यांनी पोलीस आयुक्तालयातील ज्येष्ठ नागरिक कक्षात (०२०)२६११११०३ या क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. पोलीस सहआयुक्त सुनील रामानंद, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त पी. आर. पाटील यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.