पुणे : विश्रांतवाडीतील धानोरी भागात एका ज्येष्ठ नागरिकाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.दशरथ पाचू बारवते (वय ६०, रा. भैरवनगर, आनंद पार्क, धानोरी, विश्रांतवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरीतील कुकरेजा सोसायटीच्या परिसरातील विहिरीत मृतदेह तरंगत असल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी पोलिसांना मिळाली.

त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू केले. बारवते यांचा मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी याबाबतची माहिती मुलाला दिली.

‘बारवते यांना दारू पिण्याचे व्यसन होते. त्यांच्या मणक्याची शस्त्रक्रिया झाली होती. आजारपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता आहे. ते बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार दिली हाेती,’ अशी माहिती विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांनी दिली.