पुणे : ‘माणसाने धर्म घरापुरता ठेवावा. सार्वजनिक जीवनात जात आणि धर्मकारण टाळावे लागते. सध्या पुरोगामी आणि प्रतिगामी असा सरळ संघर्ष दिसत आहे. याचे कारण हिंदुत्व ही संकल्पना भारतीय संकल्पनेच्या विपरीत आहे,’ असे मत ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी शनिवारी व्यक्त केले. प्रा. डॉ. हरी नरके स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने हरी नरके यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘जातकारण, धर्मकारण आणि भारताचे भवितव्य’ या विषयावर राजू परुळेकर यांचे व्याख्यान झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कोठडिया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रतिष्ठानच्या अध्यक्ष संगीता नरके आणि सचिव मृणाल ढोले-पाटील या वेळी उपस्थित होते.
परुळेकर म्हणाले, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सनातन यांना धर्म समजला नाही. धर्म म्हणजे संस्कृती असते. भारतीय समाज पुरोगामी होण्यापासून ११ वर्षे मागे गेला आहे, अशी माझी धारणा आहे. बाबा-बुवांचे फुटलेले पेव हे राजकारण प्रेरित आहे.’ ‘कोणताही धर्म दुसऱ्या धर्माचा आणि माणसाचा द्वेष करत नाही. जातीला द्वेषाशिवाय दुसरा आधार नाही. जाती, धर्म, राज्ये, भाषा यांचे वैविध्य असलेल्या देशात या सर्वांची बेरीज करणे योग्य, की वजाबाकी करायची, हा खरा प्रश्न आहे. हा देश सर्वांनी मिळून घडवायचा आहे. जातींची मतपेढी केल्यावर त्या जातीच्या माणसांचे भवितव्य काय असू शकते,’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
‘देशाची परिस्थिती सुधारण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय नेतृत्व बदलावे लागेल. दुर्दैवाने गांधीजींना देशाचे शत्रू मानणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या पाखंडी संस्कृतीला कडाडून विरोध झाला पाहिजे. नोटबंदीच्या माध्यमातून आधी नोट काढली गेली. आता मतांची चोरी करण्यात आली. त्यामुळे गांधीजींच्या मार्गानेच संघर्ष करावा लागेल. अहिंसेने यश मिळायला वेळ लागतो. पण, तो विजय शाश्वत असतो,’ याकडे परुळेकर यांनी लक्ष वेधले.
राजू परुळेकर म्हणाले…
– माणसाने धर्म घरापुरता ठेवावा.
– सार्वजनिक जीवनात जात आणि धर्मकारण टाळावे लागते.
– सध्या पुरोगामी आणि प्रतिगामी असा सरळ संघर्ष.
– गेल्या ११ वर्षांत फक्त नावे बदलण्याचे काम झाले.
– कोणताही धर्म दुसऱ्या धर्माचा आणि माणसाचा द्वेष करत नाही.
– गांधीजींना देशाचे शत्रू मानणाऱ्यांची संख्या वाढत आहे.