पुणे : दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला परिसरातील कला केंद्रात जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) आमदाराच्या चुलत भावाने गोळीबार केल्याच्या प्रकरणाची उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली. यासंदर्भात कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असे सांगून अटक आरोपींवर ‘मकोका’ कायद्यांतर्गत कारवाई करण्याची सूचना ग्रामीण पोलिसांना केल्याची माहिती पवार यांनी दिली.
केडगाव चौफुला भागातील एका कला केंद्रात सोमवारी (२१ जुलै) रात्री साडेअकराच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. याबाबत कला केंद्राच्या व्यवस्थापकांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. व्यवस्थापकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, भोर मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांचे चुलत बंधू बाबासाहेब मांडेकर यांच्यासह दोघांना पोलिसांनी अटक केली.
यासंदर्भात बोलताना अजित पवार यांनी तपास प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप होणार नसल्याचे स्पष्ट केले. ‘गोळीबाराच्या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून घेतली आहे. कला केंद्रातील महिलेला गोळी लागलेली नाही. गोळीबार झाल्यानंतर ही महिला बेशुद्ध झाली. गोळीबाराच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप सहन करू नका, असेही पोलिसांना सांगितले आहे. पोलीस अधीक्षक यांच्या संपर्कात असून, यातील आरोप कोणाशीही संबंधित असतील, तरी त्यांना अटक करण्याची सूचना पोलिसांना केली आहे,’ असे पवार यांनी सांगितले.
‘अटक आरोपी बाबासाहेब हा आमदार शंकर मांडेकर यांचा सख्खा भाऊ नाही. तो चुलत भाऊ आहे. मात्र कोणीही असले, तरी त्याच्यावर कारवाई होणार आहे. हवेत गोळीबार का केला, शस्त्र परवाना आहे का, या सर्व गोष्टीही पोलीस तपासात पुढे येणार असून, या प्रकरणात मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्याची सूचनाही केली आहे,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.
‘कोणताही दबाव नाही’
दरम्यान, आमदार शंकर मांडेकर यांनीही माध्यमातून या संदर्भात प्रतिक्रिया दिली. ‘गोळीबाराच्या घटनेत कोणताही दबाव आणण्यात येणार नाही. पोलीस तपासात सर्व गोष्टी पुढे येतील. माझा भाऊ कला केंद्रात गेला, ही बाबच माझ्यासाठी धक्कादायक आहे. कसे वागायचे हे ठरविले पाहिजे. माझा भाऊ अन्य आरोपींबरोबर कला केंद्रात गेला हे चुकीचेच आहे. त्याचे प्रायश्चित्त त्यांना शासन देईल,’ असे शंकर मांडेकर यांनी सांगितले.