गेली पंधरा वष्रे सलग सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीत पुणे जिल्हय़ाचा पूर्व भाग असलेल्या बारामती आणि इंदापूर तालुक्यांमध्ये मोठा विकास झाला, तेथील बाजारपेठासुद्धा सातत्याने विकसित होत राहिल्या. मात्र, आता केंद्रातील आणि राज्यातील सत्तांतरानंतर चित्र हळूहळू पालटू लागले आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये या तालुक्यांच्या बाजारपेठांची वाटचाल तेजीकडून मंदीच्या दिशेने सुरू झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.
बारामती तालुका हा शरद पवार आणि पवार कुटुंबीयांचा विकसित असा बाल्लेकिल्ला समजला जातो. आतापर्यंत या तालुक्याने अनेक सत्तेची पदे अनुभवली. स्वत: शरद पवार केंद्रीय कृषिमंत्री, त्यांचे पुतणे अजित पवार राज्यात उपमुख्यमंत्री होते. याच घराकडे सहकाराच्या नाडय़ा होत्या. शेजारी इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटीलही मंत्री होते. त्यामुळे येथे मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक झाली. त्यामुळे बाजारपेठ विकसित झाली आणि बांधकाम क्षेत्रातही तेजी होती. मात्र, आता देशात किंवा राज्यात कोठेच सत्ता नसल्याने त्याचा परिणाम स्थावर मालमत्तेच्या बाजारपेठेवरही (रियल इस्टेट) झाला आहे. दिवाळीपूर्वी बारामतीतील बांधकामांचे दर आता दिवाळीनंतर कमी झाल्याचे दिसत आहे. तसेच, कृषी व मोटार यांची बाजारपेठही हळूहळू मंदीच्या दिशेने प्रवास करू लागली आहे.
या तालुक्यांमध्ये सधन शेतकऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. मात्र, हा शेतकरीसुद्धा अतिशय सावधपणे बाजारात पसा खर्च करताना दिसतो आहे. कृषी उत्पादनाचा हमी भाव निश्चित नसल्यामुळे आता शेतकरीसुद्धा बाजारपेठेत खर्च करताना दहा वेळा विचार करताना दिसतो आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादित उसाच्या तसेच दुधाच्या भावामध्ये होणारे चढ-उतार, कृषी उत्पादित मालाच्या भावाची अनिश्चितता यामुळे शेतकरी वर्गसुध्दा संभ्रमात असल्याचे चित्र आहे. दूध व्यवसाय तर आता संकटात सापडला आहे. त्याचाही परिणाम झाल्याचे दिसत आहे.
या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणून बारामती, इंदापूरच्या बाजारपेठेत दिवाळीनंतर अपेक्षेप्रमाणे ग्राहकवर्ग नाही. सध्या लग्नसराईचा हंगाम आहे. मात्र, या हंगामातही व्यापारी पेठेत अपेक्षित गिऱ्हाईक नाही. त्यामुळे व्यापारी वर्ग विक्रीवर विशेष सूट, भेट वस्तू, सवलती जाहीर करून आपल्या मालाची विक्री करत आहेत. आधुनिक युगातील सोशल मीडियाचा वापरही व्यापारी विक्रीसाठी करताना आढळून येत आहेत.

‘‘शासनाने दुधाच्या संदर्भात योग्य अनुदान दिलेले नाही. त्यामुळे दुधाचे दर उतरत चालले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत मंदी निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्याचा परिणाम बारमती, इंदापूर तालुक्यांमध्ये झाला आहे.’’
– सोमनाथ होळकर, बारामती तालुका दूध संघाचे अध्यक्ष
.
‘‘बारामती, इंदापूर तालुक्यांमधील बांधकाम व्यवसायात सध्या मंदीचा काळ आलेला आहे. ही स्थिती दिवाळीनंतर बिकट बनली आहे. याचा येथील सदनिकांच्या दरावर परिणाम झाला आहे. त्यात दिवाळीनंतर १० ते २० टक्क्य़ांची घट पाहायला मिळाली आहे.’’
– संजय संघवी, बारामतीतील बांधकाम व्यावसायिक