देशोदेशीच्या दिग्दर्शकांनी बनवलेले शेक्सपिअरच्या कलाकृतींवर आधारित चित्रपट पुणेकर रसिकांना बघायला मिळणार आहेत. अजरामर ब्रिटिश नाटककार विल्यम शेक्सपिअर यांच्या ४५० व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने पुणे इंटरनॅशनल सेंटर आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय यांच्यातर्फे ‘कालातीत शेक्सपिअर’ या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १२ ते १५ डिसेंबर या कालावधीत होणारा हा महोत्सव सर्वासाठी विनामूल्य खुला आहे.    
‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूॅं आता हैं’, ‘सलीम लंगडे पे मत रो’ अशा वेगळ्या प्रवाहातील चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे ज्येष्ठ लेखक- दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात या महोत्सवाचे उद्घाटन होईल. उद्घाटनानंतर लॉरेन्स ऑलिव्हिए यांचा ‘हॅम्लेट’ (१९४८) हा चित्रपट दाखवला जाणार आहे. त्यानंतर १५ डिसेंबपर्यंत दररोज सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच या वेळात या महोत्सवात विविध कार्यक्रम होणार आहेत.
प्रसिद्ध दिग्दर्शक अकीरा कुरोसावा यांच्या ‘थ्रोन ऑफ ब्लड’ (१९५७) आणि ‘रॅन’ (१९८५) या चित्रपटांसह लॉरेन्स ऑलिव्हिए यांचा ‘हेन्री फाईव्ह’ (१९४४),  जेम्स आयव्हरी यांचा ‘शेक्सपिअर वाल्लाह’ (१९६५), जॉन मेडेन यांचा ‘शेक्सपिअर इन लव्ह’ (१९९८), बाझ लुहर्मन यांचा ‘रोमिओ ज्युलिएट’ (१९९६) हे चित्रपट या महोत्सवात बघायला मिळतील. रशियन दिग्दर्शक ग्रेगरी कोझित्सेव यांचा ‘हॅम्लेट’ (१९६४), विशाल भारद्वाज यांचा ‘मकबूल’ (२००४) ऑर्सान वेल्स यांचा ‘फॉल्सटॉफ/ चाईम्स अॅट मिडनाईट’ (१९६५) हे चित्रपटही दाखवले जाणार आहेत.
संगीतकार वेरोनिका कृष्णय्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बसवलेला ‘सेरेनेड फॉर शेक्सपिअर’ हा सांगीतिक कार्यक्रमही महोत्सवात सादर होणार आहे. १३ तारखेला सायंकाळी ५ वाजता हा कार्यक्रम होईल.

अभ्यासकांसाठी अंजुम रजबली यांच्या व्याख्यानाची पर्वणी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ पटकथालेखन आणि अभिनय या क्षेत्रांत कार्यरत असलेले अंजुम रजबली यांचे व्याख्यान या महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. ‘कलाकृतींच्या रुपांतरणात (अॅडाप्टेशन) येणारी आव्हाने’ या विषयावर ते बोलणार आहेत. महोत्सवात १४ तारखेला सायंकाळी ५ वाजता रजबली यांचे व्याख्यान होईल.