शनिवारवाड्यातील आतील भागात जे नक्षीकाम दिसत आहे. तो भाग केव्हाही पडू शकतो. त्यामुळे या संपूर्ण भागाची सरकारकडून लवकरात लवकर डागडुजी झाली पाहिजे. अन्य कामाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जातो. मात्र इतिहासाची साक्ष देणार्‍या वास्तुच्या डागडुजी करण्याकडे लक्ष नाही. त्यामुळे मुख्यमंत्री ज्या खुर्चीत बसले आहेत, ती खुर्ची पेशव्यांची आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे अशी भूमिका थोरले बाजीराव पेशवे यांचे वंशज उदयसिंह पेशवे यांनी मांडली आहे.

“शनिवारवाड्याची डागडुजी झाल्यास पर्यटक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येतील आणि आपला इतिहास समजण्यास त्यांना मदत होईल,” अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारवाड्याच्या २८८ व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्ली दरवाजा उघडण्यात आला. यावेळी थोरले बाजीराव पेशवे यांचे वंशज उदयसिंह पेशवे, ज्येष्ठ इतिहासतज्ञ मोहन शेटे, तसेच यावेळी नागरिक देखील उपस्थित होते.

यावेळी थोरले बाजीराव पेशवे यांचे वंशज उदयसिंह पेशवे यांनी सांगितलं की, शनिवारवाड्याचा वर्धापन दिन साजरा करण्यास नागरिक मोठ्या संख्येने आले आहेत. हे पाहून खूप आनंद झाला आहे. मात्र सध्या शनिवारवाडा आणि पेशव्यांना मराठी माणूस विसरला आहे अशी खंतदेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.