पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तब्बल ७०,००० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी यांचे आणखी घोटाळे बाहेर काढावेत, असं आवाहन केलं. यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींनी केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं. ते गुरुवारी (२९ जून) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “मोदींनी शिखर बँकेबाबत आरोप केले. मात्र, शिखर बँक तर सोडाच, पण मी कुठल्याही सहकारी बँकेचा सदस्य नाही. या सहकारी बँकांकडून मी कधी कर्जही घेतलेलं नाही. शिखर बँकेबाबत मागे एकदा तक्रार झाली होती. चौकशीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि भाजपाच्या काही लोकांची नावं आली.”

“त्या काळात फडणवीसांनी काय केलं”

“शिखर बँकेबाबतच्या आरोपांची चौकशी करण्याची जबाबदारी राज्य सरकारवर होती. त्या सर्व काळात राज्याचे मुख्यमंत्रीपद भाजपाकडे होतं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्या काळात फडणवीसांनी काय केलं हे मला माहिती नाही. मोदींनी अशाप्रकारे शिखर बँकेचा उल्लेख करण्याची गरज नव्हती,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.

“मोदींनी निराशेतून असा हल्ला केला असावा”

“मोदींनी निराशेतून असा हल्ला केला असावा. अमेरिकेचा दौरा आणि भारतातील स्थिती पाहून ते निराश झाले आणि त्या निराशेतूनच त्यांनी असा हल्ला केला असावा,” असं म्हणत शरद पवारांनी मोदींना टोला लगावला.

हेही वाचा : “शरद पवारांच्या मुलीचं भलं…”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल, म्हणाले, “राष्ट्रवादीचा ७०,००० कोटींचा घोटाळा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय आरोप केले होते?

भोपाळ या ठिकाणी भाजपाच्या बुथ कार्यकर्त्यांना संबोधित करताना नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी म्हणाले, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर तब्बल ७०,००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. असं एकही क्षेत्र नाही जिथे काँग्रेसने घोटाळा केला नसेल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीवरही घोटाळ्यांचा आरोप आहे. आता भाजपा कार्यकर्त्यांनी थोडे प्रयत्न करायला हवेत आणि यांच्या घोटाळ्यांचा मीटर वाढवायला हवा (इतर घोटाळे बाहेर काढावे).