पुणे : ‘पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील नागरिकांमध्ये अस्वस्थता होती. त्यानुसार पाकव्याप्त काश्मीर येथील दहशतवादी तळांवर हल्ला करताना भारत-पाकिस्तानमधील सीमारेषा ओलांडली जाणार नाही, याची दक्षता हवाई दलाने घेतली. हवाई दलाने केलेल्या या कारवाईला पाठिंबा आहे,’ अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी येथे मांडली.
पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केल्यानंतर पुण्यातील त्यांच्या मोदीबाग या निवासस्थानी पवार यांनी माध्यमांशी बुधवारी सकाळी संवाद साधला. ते म्हणाले, ‘या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ दिलेले नावही योग्य आहे. या कारवाईनंतर अमेरिका, जपान आणि अन्य देशांनी भारताला समर्थन दिले आहे. मात्र, चीनने समर्थन दिलेले नाही. त्यामुळे दक्ष राहण्याची आवश्यकता आहे.’
‘काश्मीर येथील हल्ल्यानंतर देशातील नागरिकांमध्ये अस्वस्थता होती. दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना गोळ्या घातल्या. पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे अनेक तळ आहेत. तेथे दारूगोळाही ठेवला जात असून, पाकिस्तानकडून त्यांना मदत केली जाते. मात्र, ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविताना भारत आणि पाकिस्तान यांतील सीमा ओलांडली जाणार नाही, याची दक्षता भारतीय हवाई दलाने घेतली,’ असे पवार म्हणाले.
‘काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर येथील विधानसभेत हल्ल्याविरोधात ठराव करण्यात आला होता. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला यांनी दहशतवादाविरोधात स्पष्ट भूमिका मांडली होती. दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीसाठी खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. राजकारण न आणता आम्ही सरकार सोबत होतो. सरकारने केलेल्या कारवाईला पूर्ण पाठिंबा आहे,’ असे त्यांनी सांगितले.
पवार म्हणाले, ‘या मोहिमेला जे नाव देण्यात आले आहे ते योग्य आहे. या मोहिमेनंतर अमेरिका, जपान आणि अन्य देशांनी भारताला समर्थन दिले आहे. मात्र, चीनकडून समर्थन देण्यात आलेले नाही. त्यामुळे दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानला स्वत:ची आणि भारताचीही ताकद माहिती आहे. पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याबाबतचे धोरणही चुकीचे नाही.’