आयटी पार्क आला म्हणजे विकास आला अशी एक सर्वसाधारण धारणा निर्माण होऊ लागली आहे. या धारणेनुसार राजकारणीही अलीकडे आयटी पार्कसाठी आग्रह धरू लागले आहेत. पुरंदरमधील आयटी पार्कची मागणी त्यापैकीच एक.

माहिती तंत्रज्ञान (आयटी) पार्कमुळे एखाद्या शहराची ओळख कशी बदलते याचे जिवंत उदाहरण म्हणजे पुणे. या उद्योगाची चमक सर्वांनाच भुरळ पाडणारी. हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कची सुरुवात १९९० मध्ये झाली. हिंजवडीसह माण, मारुंजी गावचा चेहरामोहरा या आयटी पार्कमुळे बदलला. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या या आयटी पार्कमध्ये आल्या. त्या निमित्ताने देशभरातील कुशल संगणक अभियंते पुण्यात येऊ लागले. हिंजवडी परिसरात गावपणाचा मागमूसही दिसू नये, अशी परिस्थिती सध्या आहे. यानंतर खराडी परिसरात आयटी पार्क आला. त्यामुळे खराडीसह वाघोली परिसराचे रूप पालटले. आता पुरंदर परिसरात आयटी पार्कची मागणी जोर धरू लागली आहे.

पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाबरोबरच आयटी पार्कही स्थापन करण्याचा आग्रह सरकारकडे केला जात आहे. शिवसेना (शिंदे) पक्षाचे आमदार विजय शिवतारे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्याच पक्षाचे नेते व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे आयटी पार्कसाठी त्यांनी शब्द टाकला. हिंजवडी आयटी पार्कमधील अपुऱ्या पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी यामुळे सातत्याने चर्चेत आहे. त्यातच यंदा या आयटी पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी तुंबून ते वॉटर पार्क बनले होते. पुरंदरमधील आयटी पार्कमुळे हिंजवडी आयटी पार्कमधील पायाभूत सुविधांवरील वाढलेला ताणही कमी होईल, असा युक्तिवाद यामागे होता. याचबरोबर पुरंदर परिसराच्या विकासालाही चालना मिळेल, असेही त्यांचे म्हणणे होते.

पुरंदर तालुक्यातील दिवे, चांबळी आणि कोडीत या गावांच्या परिसरात आयटी पार्क उभारण्याचा प्राथमिक प्रस्ताव आहे. महसूल विभागाची दिवे येथे सातशे एकर, चांबळी येथे तीनशे आणि कोडीत येथे चारशे एकर अशी सुमारे १ हजार ४०० एकर गायरान जमीन आहे. उदय सामंत यांच्याकडे उद्योगमंत्री या नात्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) जबाबदारी आहे. त्यांनी तातडीने बैठक घेऊन एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना आयटी पार्कसाठी जमिनीची पाहणी करण्याचे निर्देश दिले. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनीही तातडीने पाहणीचे पाऊल उचलले. या पाहणीनंतर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी वस्तुस्थितीदर्शक अहवाल उद्योग विभागाला सादर केला आहे. मात्र, त्यात वेगळाच मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

पुरंदरमधील आयटी पार्कसाठी एकूण प्रस्तावित जागा ५७२ हेक्टर (१ हजार ४१३ एकर) आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत या जमिनीपैकी जवळपास ७० टक्के जमीन डोंगराळ असल्याचे समोर आले. केवळ ३० टक्के जमीन सपाटीची आहे. दिवे परिसरातील जमीन सपाटीची असून, चांबळी आणि कोडीत परिसरातील जमीन डोंगराळ आहे. यामुळे आयटी पार्क उभारण्यासाठी ही जमीन योग्य नसल्याचे एमआयडीसीतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. किमान एक हजार एकर तरी सपाटीची जमीन असावी, अशी भूमिका घेण्यात आली आहे. आयटी पार्क उभारण्यासाठी पुरंदरमधील जमीन योग्य नसल्याने तिथे तो होण्याची शक्यता कमी असल्याचे एमआयडीसीतील अधिकारी खासगीत सांगत आहेत. त्यामुळे पुरंदरमधील आयटी पार्क हे दिवास्वप्नच राहण्याची शक्यता आहे.

sanjay.jadhav@expressindia.com