पुणे : केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेले महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कसे सामोरे जाणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. पुणे महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने १०० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवित महापालिकेत एकहाती सत्ता मिळविली होती.
भाजपला मागील निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याचा निर्धार शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे, तर भाजपबरोबर सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून महापालिकेच्या निवडणुकीत महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाऊ असे सांगितले जात आहे. राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीदेखील काही दिवसांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतल्यानंतरच निर्णय घेतला जाईल, असे सांगून महायुतीबाबतची उत्सुकता अधिकच वाढविली आहे.
पुण्यात एका कार्यक्रमासाठी आलेल्या शिवसेना (शिंदे) पक्षाचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत भाष्य केले आहे. हडपसर भागातील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा मंत्री सामंत यांच्या उपस्थितीत पार पडला. सामंत म्हणाले, ‘हडपसर मतदारसंघात होत असलेली ही विकासकामे जनतेच्या जीवनात शिवसेनेच्या माध्यमातून होणाऱ्या विकासाचेच द्योतक आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्पष्ट दृष्टिकोनामुळे आणि जनतेशी असलेल्या बांधिलकीमुळेच हा वेगवान विकास शक्य झाला. डीपी रस्त्यांच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघातील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मदत होईल. महायुतीने केलेल्या कामामुळे सर्वसामान्य नागरिकांचे अनेक प्रश्न मार्गी लागले असून, जनतेच्या हितासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार आहोत.’
हडपसरच्या नागरिकांसाठी पुणे शहरात जाण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या रस्त्यांच्या लोकार्पणामुळे परिसरातील वाहतूक कोंडी लक्षणीय प्रमाणात कमी होणार आहे. यामुळे प्रवासाचा कालावधी कमी होऊन नागरिकांना सुरक्षित, सुगम आणि वेगवान प्रवासाचा लाभ होईल. तसेच, स्थानिक व्यवसाय, शाळा, आरोग्य सुविधा आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जीवनमानात मोठा बदल होणार आहे. शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि प्रशासनाशी थेट समन्वय साधून घेतलेल्या पुढाकारामुळे ही कामे विक्रमी वेगाने पूर्ण झाली.’ “दोन वर्षांत जे शक्य झाले, ते २० वर्षांतही झाले नसते,’ असेही मंत्री उदय सामंत म्हणाले.