खड्ड्यांवरून सध्या राजकारण चांगलेच तापले असून खड्ड्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्याची संधी भाजपने साधली आहे. भाजपतर्फे सेल्फी विथ खड्डा स्पर्धेचे प्रदर्शन मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्यासमोरील प्रांगणात घेण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून भाजपने शिवसेनेला आव्हान दिले होते. दरम्यान पुण्यात देखील हीच परीस्थिती पाहायला मिळत आहे. मात्र या ठीकाणी भाजपा सत्तेत आहे. त्यामुळे शिवसेनेने पुणे शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याच्या निषेधार्थ महापालिकेतील सत्ताधारी भाजपा विरोधात अभिनव चौक ते टिळक रोडवरील न्यू इंग्लिश पर्यंत बैलगाडी चालवित खड्डा मणका आंदोलन करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी शिवसैनिकांनी रस्त्यावरील खड्ड्यांना पांढर्‍या रंगाने गोल करून त्या बाजूला भाजपा नेत्यांची नाव देऊन अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, भाजपाचे नेते आशिष शेलार, महापौर मुरलीधर मोहोळ या नेत्यांची नाव खड्ड्यांना देण्यात आली आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.

यावेळी शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे म्हणाले की, “शहरातील खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना वाहन चालविताना विविध त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे वाहनचालकांना पाठदुखीमुळे उपचारासाठी डॉक्टर किंवा गाडीच्या दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये जाव लागत आहे. या त्रासातून पुणेकर नागरिकांची सुटका व्हावी आणि महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला जागा यावी, या मागणीसाठी आज आम्ही खड्डा आंदोलन आयोजित केले. तसेच  भाजपाच्या नेत्यांनी अनेक आश्वासने दिली. मात्र त्यातील कोणतीही आश्वासने पूर्ण करण्यात हे अपयशी ठरल्याने आम्ही खड्ड्यांना भाजपाच्या नेत्यांची नावे देऊन निषेध नोंदविला आहे.”

“या आंदोलनाची महापालिकेतील सत्ताधारी पक्षाने दखल घेऊन पुणेकर नागरिकांची खड्ड्यातून सुटका करावी, अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन केले जाईल”, असा इशारा यावेळी शिवसेना शहरप्रमुखांनी दिला. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena named the pits in pune chandrakant patil ashish shelar narayan rane srk 94 svk
First published on: 19-10-2021 at 19:28 IST