शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना खुले आव्हान दिले आहे. निवडणुकीत जे आश्वासन दिले आहे ते पूर्ण करण्यासाठी लांडेवाडी येथील घाटात या असे म्हणत आढळराव पाटलांनी खासदार अमोल कोल्हेंवर टीका केली आहे. मी खासदार अमोल कोल्हे यांना जाहीर निमंत्रण दिलं होतं, की बैलगाडा शर्यतीसाठी घोडीवर बसायचं असेल तर लांडेवाडी घाटात या, असे शिवाजी आढळराव पाटील म्हणाले. शुक्रवारी आंबेगाव येथे आयोजीत करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैलगाडा मालक, चालक आणि प्रेमींना संबोधित करताना हा टोला लगावला आहे.
“खासदार अमोल कोल्हे यांना निमंत्रण दिल होतं. कोणावर टीका करून तोंड खराब करायचं नाही. लांडेवाडीत महाराष्ट्राच्या कानाकोऱ्यातून बैलगाडा शौकीन उपस्थित आहे. या सर्वांचे मी आभार मानतो. मी खासदार म्हणून सर्व ठिकाणी बैलगाडा घाट बांधून दिले. काही पत्रकार विचारत होते, सध्याच्या खासदारांना निमंत्रण दिल का?, हो त्यांना जाहीर निमंत्रण दिलं होत. बैलगाडा शर्यतीसाठी घोडीवर बसायचं असेल तर लांडेवाडीत या,” असे शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले.
“प्रचारादरम्यान कोल्हे साहेब म्हणाले होते,की बैलगाडा शर्यती सुरू होतील तेव्हा हा पठ्ठ्या बारीच्या पुढे पहिल्या बारीवर बसेल. म्हणून मी त्यांना विनंती केली. निवडणुकीत जे आश्वासन दिले ते पूर्ण करण्यासाठी का होईना आमच्या घाटात या, असा खोचक टोला शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले अमोल कोल्हे होते?
“हा अमोल कोल्हे मालिका विश्वातून निवृत्ती घेणार आणि तुमच्या सेवेसाठी उपस्थित असणार. तसा दुसरा शब्द बैलगाडा मालकांना देतो. ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल. त्या दिवशी हा तुमचा पठ्ठ्या पहिल्या बारी मोर्ह घोडी धरणार म्हणजे धरणार हा शब्द देतो,” असे अमोल कोल्हे यांनी म्हटले होते.