पुणे : शिवाजीनगर बस स्थानकाची पुनर्बांधणी महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशन (महामेट्रो) आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) विभागाच्या समन्वयाअभावी रखडल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही विभागांनी पुनर्बांधणीचा कोणताही प्रस्ताव अद्याप तयार केला नसून, याबाबतीत एकमेकांकडे बोट दाखवले जात आहे. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी तीन महिन्यांपूर्वी दोन्ही विभागांनी करार करून अत्याधुनिक बस स्थानक आणि मेट्रो स्थानक याबाबतचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते. मात्र, याबाबत कुठलीच कार्यवाही झालेली नाही.
शिवाजीनगर बस स्थानकाच्या जागेवर मेट्रो स्थानक आरक्षित करण्यात आले असून, काही वर्षांसाठी शिवाजीनगर बस स्थानक वाकडेवाडी येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. विशिष्ट कालावधीत पुनर्बांधणी करून देण्यासाठी विभागांमध्ये करार करण्यात आला असतानाही चार वर्षांच्या कालावधीमध्ये स्थानकाच्या पुनर्बांधणीबाबत कुठलीही हालचाल दिसली नाही. दरम्यान, शिवाजीनगर बस स्थानक सार्वजनिक, खासगी, भागीदारी (पीपीपी) तत्त्वानुसार विकसित करण्याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट करून तातडीने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून मान्यतेसाठी पाठवावा, असे आदेश दिले. मात्र, एसटी महामंडळाकडून महामेट्रोकडे कुठलाच प्रस्ताव प्राप्त झाले नसल्याचे ‘महामेट्रो’कडून स्पष्ट करण्यात आले आहे.
‘महामेट्रो’ने जेवढ्या प्रमाणात जागा ताब्यात घेतली, तितक्याच क्षेत्रफळाची जागा विकसित करून देणे अपेक्षित असल्याची भूमिका एसटी महामंडळाकडून घेण्यात आली आहे. तसेच, पीपीपी तत्त्वानुसार किती वर्षांसाठी जागा भाडेतत्त्वावर द्यायची, याबाबत एसटी महामंडळ धोरण ठरवणार असल्याने प्रस्ताव रखडल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मेट्रो स्थानकासाठी शिवाजीनगर बस स्थानकाची जागा ठराविक वेळेत विकसित करून देण्याच्या करारानुसार ताब्यात घेण्यात आली आहे. मात्र, करारात साडेचार एकर जागेपैकी एक एकर जागा महामेट्रो विकसित करून देईल, उर्वरित साडेतीन एकर जागा महामंडळाच्या निर्णयानुसार विकसित करण्यात येईल, असे करारात नमूद करण्यात आले आहे. मात्र, एसटी महामंडळाकडून गेल्या साडेचार वर्षांत एकही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही.हेमंत सोनवणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो
शिवाजीनगर बस स्थानक पीपीपी तत्त्वानुसार विकसित करण्यात येणार असून, भाडेतत्त्वावर देण्याचा कालावधी किती वर्षांचा असेल, याबाबत निर्णय झालेला नाही. तसेच, महसूल विभागाकडे पाठविण्यात आलेल्या अभिप्रायामध्ये त्रुटी आढळून आल्या आहे. या त्रुटी दुरुस्त करून येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करून निर्णय घेण्यात येईल. दोन महिन्यांत शिवाजीनगर बस स्थानकाचा प्रश्न मार्गी लागेल.प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री