मागणी वाढल्याने कागदी पिशव्यांचा तुटवडा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्लास्टिकबंदीचे आदेश सरकारकडून देण्यात आल्यानंतर बाजारातील भाजी तसेच फळ विक्रेते, किराणामाल विक्रेत्यांसह अनेक व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानातून प्लास्टिक पिशव्या हद्दपार केल्या आहेत. कारवाईच्या धसक्यामुळे कागदी पिशव्यांचा वापर सुरूकरण्यात आला असला तरी कागदी पिशव्या जादा वजनाचा माल ठेवण्यास तकलादू ठरत असल्याची ओरड विक्रेते करत आहेत.

प्लास्टिकबंदीचे आदेश आल्यानंतर व्यापारी तसेच विक्रेत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. वजनाने हलक्या असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा (पन्नास मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या) वापर फळे तसेच भाजीपाला विक्रेत्यांकडून केला जातो.प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आल्यामुळे गेल्या दोन, तीन दिवसात शहरातील मंडई, नेहरू चौक भागातील फळे तसेच भाजीपाला विक्रेत्यांनी प्लास्टिक पिशव्या हद्दपार केल्या आहेत. प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असल्यामुळे त्यांनी कागदी पिशव्यांचा वापर सुरू केला आहे. रविवार पेठेतील बोहरी आळी भागात कागदी पिशव्यांचे विक्रेते आहेत. कागदी पिशव्यांना मागणी वाढल्याने बाजारात त्यांचा तुटवडा जाणवत आहे. बंदीनंतर भाजी खरेदीस आलेल्या ग्राहकांना व्यापारी कागदात माल बांधून देत आहोत.

कार्यालयीन वेळेनंतर पिशव्यांचा वापर

प्लास्टिकबंदीमुळे हप्तेखोरीत भर पडणार असल्याचा आरोप विक्रेत्यांकडून करण्यात आला आहे. प्लास्टिक पिशवी आढळल्यास कारवाई करून दंड आकारला जातो. महापालिका तसेच अन्य यंत्रणांना कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. प्लास्टिक बंदीमुळे महापालिकेच्या पथकातील काही जण किरकोळ विक्रेत्यांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळतील. झोपडपट्टी भागात काही किराणामाल विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो. महापालिकेचे कामकाज सायंकाळी संपल्यानंतर काही विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो. प्लास्टिकबंदीच्या आदेशामुळे किरकोळ विक्रेते संभ्रमावस्थेत आहेत. गुटखाबंदी झाल्यानंतर आजही बाजारात गुटखा सहज मिळतो.

किराणा माल विक्रेत्यांची पंचायत

साधारण वीस वर्षांपूर्वी किराणा माल खरेदी करुन तो हातातून नेणाऱ्यांचे प्रमाण जास्त होते. तेव्हा कागदी पुडीतून साखर, चहा पावडर आणि अन्य किराणा माल बांधून दिला जात होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या पद्धतीने खरेदी करणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. पाच ते दहा किलो साखर किंवा तांदूळ घेतल्यास ते कागदी पिशवीत देता येत नाही. कागदी पिशव्या जादा वजनाचा भार पेलू शकत नाहीत. ग्राहकांकडून प्लास्टिक पिशवीबाबत विचारणा होते, अशी माहिती किराणामाल विक्रेत्यांकडून देण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shopkeepers use paper bags in pune
First published on: 28-03-2018 at 05:00 IST