ऐतिहासिक वारसा लाभलेल्या देखण्या वास्तू, एकेकाळी स्वातंत्र्यलढय़ातील महत्त्वाच्या व्यक्तींचे वास्तव्य लाभलेली ठिकाणे, शहराला ‘विद्येचे माहेरघर’ अशी ओळख प्राप्त करून देणाऱ्या संस्था.. पुण्यात दाखवण्यासारखे बरेच काही आहे. हा ठेवा पर्यटकांना दाखवण्यासाठी विविध संस्था कामही करत आहेत. असे असले तरी पर्यटनाच्या क्षेत्रात पुण्याचे ‘ब्रँडिंग’ कमी पडत असल्याचे स्पष्ट चित्र आहे. शहरात असलेली सार्वजनिक स्वच्छतागृहांची वानवा आणि एकूणच अस्वच्छता असे मुद्दे स्थानिक पर्यटनासाठी अडसर बनत आहेत.

‘जनवाणी’सारख्या काही संस्था शहरात ‘हेरिटेज वॉक’ आयोजित करतात. सकाळी लवकर सुरू होणाऱ्या या हेरिटेज वॉकच्या वेळी सार्वजनिक स्वच्छतागृहांचा असलेला अभाव प्रकर्षांने जाणवतो, असा अनुभव संस्थेच्या हेरिटेज कक्षाच्या उपसंचालक प्राजक्ता पणशीकर यांनी सांगितला. त्या म्हणाल्या, ‘‘एकूण सार्वजनिक स्वच्छतेकडेही अधिक लक्ष पुरवणे गरजेचे आहे. हेरिटेज वॉकच्या पर्यटकांमध्ये वयस्कर मंडळी व परदेशी नागरिकही असतात आणि शनिवारवाडय़ासारख्या ठिकाणी गेल्यावर स्वच्छतागृहात जाण्याची वेळ आल्यास अत्यंत घाणेरडे व दरुगधी येणारे स्वच्छतागृह त्यांच्यासमोर येते. पर्यटनस्थळे स्वच्छ असणे व त्या ठिकाणी चांगल्या स्वच्छतागृहांची सोय असणे फार गरजेचे आहे. वाहतुकीच्या सुविधा आणि सुरक्षितता हे मुद्देही महत्त्वाचे आहेत.’’

पुण्यात येणाऱ्या लोकांना काय बघावे असा प्रश्न पडतो. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुणे काय आहे हे सांगणारी काहीही यंत्रणा विमानतळ वा रेल्वे स्थानकावर नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. त्या म्हणाल्या, ‘‘पुण्याचा वारसा, प्रेक्षणीय ठिकाणे, स्वातंत्र्यलढय़ातील योगदान या गोष्टींची माहिती देण्यासाठी खास पुण्याची अशी एखादी भिंत अशा ठिकाणी करायला हवी किंवा छोटे माहिती केंद्र हवे. सरकारी सोईंबरोबरच पुणे दर्शन व हेरिटेज वॉक करणाऱ्या विविध संस्थांची माहिती तिथे देता येईल. पुणे महापालिका व महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने इतर संस्थांना पाठबळ द्यायला हवे. जसे पर्यटन हे पालिकेचे प्रमुख काम नाही, तसेच स्वच्छता हे एमटीडीसीचे काम नाही, शिवाय खासगी संस्थांना पर्यटनातील अडसर अधिक चांगल्या प्रकारे माहीत असतात. त्यामुळे सर्वानी एकत्र येणे गरजेचे ठरते. ‘जनवाणी’ आयोजित करत असलेल्या पर्यटन महोत्सवात पुण्यातील तीस संस्था एकत्र येतात. आपल्याला ‘काला घोडा फेस्टिव्हल’ किंवा ‘जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल’सारखे व्हायचे असेल तर सर्व संस्थांच्या संसाधनाचा वापर व्हायला हवा.’’