पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी, मतदान केंद्र निश्चित करणे, आरक्षण सोडत प्रक्रिया राबविण्याच्या कामाला गती द्यावी. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे काम झाले पाहिजे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जबाबदारी चोखपणे पार पाडून मुदतीमध्ये कामकाज पूर्ण करण्याच्या सूचना महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक असलेले श्रावण हर्डीकर यांच्याकडे महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. हर्डीकर यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली असून ते बिहारला आहेत. त्यामुळे हर्डीकर यांनी दृक-श्राव्य माध्यमातून अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, शहर अभियंता मकरंद निकम, निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार, मुख्य लेखाधिकारी प्रमोद भोसले, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यावेळी उपस्थित होते.

महापालिकेची चार सदस्यीय पद्धतीने ३२ प्रभागांची रचना अंतिम झाली आहे. १२८ नगरसेवक असणार आहेत. ही प्रभागरचना अंतिम करताना सहा प्रभागांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) लोकसंख्येची आकडेवारी बदलल्याने या वर्गाच्या आरक्षणात बदल झाले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडत घेण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आरक्षण सोडतीची माहिती ११ नोव्हेंबरला आयोगाला सादर करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त हर्डीकर यांनी ऑनलाइन पद्धतीने अधिकाऱ्यांची बैठक घेतली. निवडणूक तयारीचा आढावा घेतला.

आरक्षण सोडतीची प्रक्रिया राबविण्यासाठी तयारी सुरू करावी. प्रभागनिहाय मतदारयादी तयार करण्याच्या कामाला गती द्यावी. सहा नोव्हेंबरला प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करावी. निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काळजीपूर्व काम करावे. दिलेली जबाबदारी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजन करून मुदतीमध्ये पार पाडावी. मतदारसंख्या वाढल्याने मतदान केंद्रात होणारी वाढ, मतदान केंद्र निश्चित करणे, मतदान यंत्र (ईव्हीएम) मशिनची उपलब्धता, वाहन अधिग्रहण, मनुष्यबळाचे वाटप, संगणकीय कामकाज, स्वीप व्यवस्थापन, निवडणूक खर्च व्यवस्थापन, न्याय व विधी कक्ष, माध्यम कक्ष, जनजागृती, तत्काळ करावयाच्या उपाययोजना, कार्यवाहीबाबत संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना आयुक्त हर्डीकर यांनी दिल्या.