साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर आता भाविकांना तोकडे कपडे घालून आल्यास प्रवेश दिला जाणार नाही. पुरुष व महिला भाविकांना आजपासून हा नियम लागू करण्यात आला आहे .राज्यातील अनेक देवस्थानांनी  यापूर्वीच ड्रेस कोड लागू केले आहेत .त्याचप्रमाणे जेजुरीच्या खंडोबा गडावर सुद्धा आता ड्रेस कोड लागू झाला आहे .

जेजुरीचा खंडोबा हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गडावर दररोज हजारो भाविकांची गर्दी असते.याशिवाय वर्षाकाठी  खंडोबाच्या सात मोठ्या यात्रा येथे भरतात. यात्रा कालावधीमध्ये तीन ते चार लाख भाविक जेजुरीत देवदर्शनासाठी येत असतात.

या दृष्टीने श्री मार्तंड देवस्थानने आज जेजुरी गडावर वस्त्र संहिता जपण्यासाठी घेतलेला निर्णय महत्त्वाचा आहे . आज गडाच्या मार्गावर सूचना फलक लावण्यात आले.यावेळी श्री मार्तंड  देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त अभिजीत देवकाते, विश्वस्त ॲड पांडुरंग थोरवे, राजेंद्र खेडेकर, मुख्य व्यवस्थापक आशिष बाठे ,सतीश घाडगे ,विलास बालवडकर,  बाल अभिनेता दर्श खेडेकर आदि उपस्थित होते.

जेजुरीच्या गडावर भाविकांची गर्दी वाढत आहे .प्रामुख्याने खंडोबा हे अठरापगड जातीचे कुलदैवत असल्याने राज्यभरातून  खंडोबा गडावर नवविवाहित जोडपी कुलधर्म कुलाचार करण्यासाठी येत असतात.

  मुख्य विश्वस्त अभिजीत देवकाते यांनी फलकाचे उद्घाटन केल्यानंतर येथील पावित्र्य जतन करण्यासाठी खंडोबा देवस्थानने ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ,आम्ही भाविकांना विनंती केली आहे, आपण आपल्या घरी पूजा, मंगल कार्य असल्यावर जसे कपडे परिधान करतो ,तसे कपडे परिधान करून गडावर यावे. हा नियम पुरुष व महिला दोघांनाही लागू आहे .गुडघ्यापेक्षा वर असणारे कपडे परिधान करू नये .शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट, फाटलेल्या जीन्स, हाफ पॅन्ट,( बर्मुडा )असा पेहराव नको. इतरांना संकोच वाटेल असे कपडे परिधान करून गडावर येऊ नये.सध्या आम्ही सर्वांना विनंती करीत आहोत ,परंतु त्यातूनही जे नियम मोडतील त्यांच्यावर नाईलाजाने कारवाई करावी लागेल असे सांगितले.

भारतीय संस्कृती जतन करण्याच्या दृष्टीने आम्ही हा निर्णय घेतला आहे. जेजुरीच्या खंडोबा गडावर लग्न झाल्यावर पारंपारिक पद्धतीनुसार नवरा बायकोने जोडीने येण्याची प्रथा आहे. यावेळी विशेष म्हणजे पाच पायऱ्या बायकोला कडेवर घेऊन पायऱ्या चढायची परंपरा आजही पाळली जाते .मात्र यावेळी वधू-वरांचे पोशाख आपल्या भारतीय संस्कृतीला साजेसे असतात.जेजुरीचा खंडोबा गड ऐतिहासिक आहे याचे पावित्र्य टिकले पाहिजे व भाविकांची यात्रा आनंददायी झाली पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे असे विश्वस्तांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुचाकी वर येणाऱ्या तरुण-तरुणींना लगाम बसणार

जेजुरीचा खंडोबा हा नवसाला पावणारा देव म्हणून प्रसिद्ध आहे या ठिकाणी अनेक तरुण-तरुणी खंडोबा गडावर देवदर्शनासठी येतात, मात्र अनेक जणांचा पेहराव हा आपल्या भारतीय संस्कृतीला शोभणारा नसतो . काहीजण गडाच्या परिसरामध्ये असणाऱ्या बागेत विचित्र पद्धतीने वागताना सुद्धा यापूर्वी आढळलेत .मात्र देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना समज देऊन सोडून दिले. खंडोबा गड हा उंच डोंगरामध्ये असल्यामुळे अनेक पर्यटकही येथे येतात. पर्यटनाबरोबर खंडोबाचे दर्शन त्यांना घडते, मात्र त्यांना सुद्धा आता हे नियम काटेकोरपणे पाळावे लागतील.