पुणे : पिस्तुलाच्या धाक दाखवून एकाला जीवे मारण्याची धमकी देण्याबरोबरच खंडणी मागितल्या प्रकरणी गुंड श्वेतांग निकाळजेसह साथीदारांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पसार झालेल्या निकाळजेसह साथीदारांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी श्वेतांग निकाळजे, रोमिओ कांबळे, ओम गायकवाड (तिघे रा. भीमनगर, मंगळवार पेठ), स्वप्नील कांबळे (धायरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निकाळजे याची मंगळवार पेठ, तसेच भारती विद्यापीठ भागात दहशत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदा पिस्तूल बाळगणे, दहशत माजविणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे निकाळजे याच्याविरुद्ध फरासखाना, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
येरवडा कारागृहात काही वर्षांपूर्वी निकाळजे आणि साथीदारांनी सांगलीतील एका गुंडावर हल्ला केला होता. या घटनेत गुंड गंभीर जखमी झाला होता. शिवाजीनगर न्यायालयासमोर निकाळजे आणि साथीदारांनी एका साक्षीदारावर पिस्तुलातून गोळीबार केला होता. एका अल्पवयीन युवतीला धमकावून तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी निकाळजेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तक्रारदार तरुण आंबेगाव पठार भागात राहायला आहे. निकाळजे आणि तरुणाची ओळख आहे. मोबाइल मनोऱ्याच्या काम तरुणाला मिळाले होते. ८ ऑक्टोबर रोजी निकाळजे, कांबळे गायकवाड यांनी तक्रारदार तरुणाला भेटायला बोलाविले. ‘तू आता मोठा झाला आहे. तू कंपन्यांचे काॅन्ट्रॅक्ट मिळवायला लागला आहे. आम्हाला आता विचारत नाही’, अशी धमकी आरोपींनी त्याला दिली. त्यानंतर तरुणाला धमकावून मोटारीतून भोर परिसरात नेले. निकाळजेने त्याच्याकडील दोन पिस्तुले काढली. ‘कोणत्या पिस्तुलातून तुला गोळी घालू’, अशी धमकी दिली. त्यानंतर घाबरलेल्या तरुण आरोपींच्या तावडीतून पळाला.
त्यानंतर आरोपींनी तरुणाला पकडून शिवाजीनगर भागात आणले. त्याला मारहाण करून कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपी पसार झाले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करत आहेत.
वादातून महिलांना बेदम मारहाण करणारे अटकेत
किरकोळ वादातून टोळक्याने महिलांना बेदम मारहाण केल्याची घटना लोणी काळभोर भागात घडली. या प्रकरणी चौघांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी तुषार रामलिंग घोडे (वय २५, रा. रामटेकडी, हडपसर), सर्फराज समीर शेख (वय २०, रा. गंगानगर, हडपसर), करण कन्हैया गुजराती (वय २०), हरुन जावेद शेख (वय २२, रा. वैदूवाडी, हडपसर) यांना अटक करण्यात आली. याबाबत एका महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि तिची बहीण लोणी काळभोरमधील कदमवाक वस्ती परिसरात राहायला आहे. १५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास आरोपी घोडे, शेख, गुजराती, शेख हे महिलेच्या घरात शिरले. महिला आणि तिच्या बहिणीला बेदम मारहाण केली. आरोपींनी त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्र उगारून जीवे मारण्याची धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर तपास करत आहेत.
