पुणे : राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्यात (एनआयआरएफ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची घसरण झाल्याचा प्रकार ताजा असताना, विद्यापीठ संकुलातील शैक्षणिक विभागांमध्ये पीएचडीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या चार वर्षांत पीएचडीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २३५वरून केवळ १७पर्यंत कमी झाली आहे. याचा परिणाम संशोधनावर होऊन, शोधनिबंध कमी प्रमाणात प्रसिद्ध झाले आहेत.

विद्यापीठाची अधिसभा मंगळवारी (३० सप्टेंबर) आयोजित करण्यात आली आहे. या अधिसभेची कार्यक्रमपत्रिका अंतिम झाली आहे. अधिसभेसाठी सदस्यांनी काही ठराव मांडले आहेत. तसेच, सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना व्यवस्थापन परिषद सदस्यांनी उत्तरे दिली आहेत. त्यात अधिसभा सदस्य शंतनू लामधाडे, डॉ. चिंतामण निगळे यांनी पीएचडी प्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नाला व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. संगीता जगताप यांनी लेखी उत्तर दिले आहे.

विद्यापीठाशी संलग्न इतर महाविद्यालयांमध्ये पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवले जातात. काही विभागांमध्ये पूर्ण क्षमतेने प्रवेश झाले. मात्र, विविध कारणांमुळे कालांतराने काही विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले. प्रवेशाची अंतिम तारीख निघून गेल्यामुळे त्या जागा रिक्त राहिल्या. परिणामी विद्यापीठातील पदवी, पदव्युत्तर स्तरावरील ३६ विभागांत क्षमतेपेक्षा कमी प्रवेश होऊन सुमारे २ हजार जागा रिक्त राहिल्या.

विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांमध्ये प्राध्यापकांची संख्या कमी असल्याने संशोधन मार्गदर्शकांची संख्या कमी झाली आहेत. त्याचाही परिणाम पीएचडीच्या विद्यार्थीसंख्येवर झाला. दुसरीकडे, खासगी आणि अभिमत विद्यापीठांमध्ये हे अभ्यासक्रम राबवले जात असल्याने विद्यार्थ्यांनी तेथे प्रवेश घेतले.

‘गेल्या चार वर्षांत पीएचडी प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या २३५वरून १७पर्यंत कमी झाली आहे. तसेच पीएचडी प्रवेशित अनेक विद्यार्थी नोंदणी झाल्यापासून सहामाही प्रगती अहवाल पूर्ण करत नाहीत, संशोधन केंद्र अथवा मार्गदर्शक यांनाही प्रतिसाद देत नाहीत. संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्याची कार्यवाही केल्यावर मार्गदर्शकांकडील रिक्त जागा नवीन प्रवेशांसाठी उपलब्ध होत आहेत. तसेच, विद्यापीठाच्या निधीतून दर वर्षी २० विद्यार्थ्यांना पोस्ट डॉक फेलोशिप (संशोधन अधिछात्रवृत्ती) देण्यात येते. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात १४ विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती देण्यात आली. पीएचडीचे प्रवेश कमी झाल्यास संशोधन प्रसिद्ध होण्याचे कमी होते,’ अशीही माहिती विद्यापीठाने दिली.

विद्यापीठातील विभागांमधील पीएचडीसाठी प्रवेशित विद्यार्थी

वर्ष – विद्यार्थिसंख्या

२०२१-२२ – २३५

२०२२-२३ – १६२

२०२३-२४ – ५१

२०२४-२५ – १७