पुणे : टेमघर धरणाची गळती रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन संस्थेकडून (सेंट्रल वॉटर ॲण्ड पॉवर रिसर्च स्टेशन – सीडब्ल्यूपीआरएस) एकाचवेळी कामे सुचविण्यात आली होती. त्यानुसार एकाचवेळी कामे झाली असती, तर शंभर टक्के गळती थांबविण्यात आले असते. मात्र, काही कारणास्तव ठरावीक कामांनाच मंजुरी देण्यात आल्याने ९० टक्केच गळती रोखण्यात यश आले, अशी स्पष्टोक्ती सोमवारी सीडब्ल्यूपीआरएसचे संचालक डाॅ. प्रभातचंद्र यांनी दिली.

सीडब्लूपीआरएस’ संस्थेकडून ११ आणि १२ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत डाॅ. प्रभातचंद्र बोलत होते. ते म्हणाले, ‘टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झाल्यानंतर जलसंपदा विभागाकडून संस्थेकडे मदत मागण्यात आली. त्यानुसार संस्थेचे अभियंते, अधिकारी यांनी धरणाची पाहणी केली. यावेळी सिमेंट, ‘सिलिका’, ‘फ्लॅश ॲश’ यांसारखे सात प्रकारचे घटक एकत्रित करून मिश्रण तयार केले. ड्रिलिंग, ग्राऊटिंग या पद्धतीने धरणाच्या बाहेरील बाजूच्या भिंतींमध्ये ९० अंशांच्या कोनात ‘ड्रिल’च्या साहाय्याने छिद्रे पाडण्यात आली. या छिद्रांमध्ये हे मिश्रण सोडण्यात आले. त्यामुळे धरणाची ९० टक्के गळती थांबविण्यात यश मिळाले. मात्र हे प्रतिबंधात्मक उपाय एकाच वेळी सर्व गळती होणाऱ्या ठिकाणी करण्याचे संस्थेकडून सुचविण्यात आले होते. काही कारणांनी तसे होऊ शकले नाही. त्यामुळे १०० टक्के गळती रोखण्यात अद्यापही यश मिळाले नाही.’

गळती लागल्यानंतर कोणती प्रतिबंधात्मक कामे करणे आवश्यक आहे याचा अभ्यास, राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाला मार्गदर्शन आणि सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार एकाच वेळी धरणाच्या बाहेरील भागात गळती होणाऱ्या ठिकाणी काम करणे गरजेचे होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

२०१७ पासून दुरुस्तीचे काम

शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आणि एक हजार हेक्टर क्षेत्रफळ सिंचनाखाली आणण्यासाठी मुळशी तालुक्यातील लव्हार्डे येथे २००१ मध्ये ३.७१ अब्ज घनफूट (टीएमसी) क्षमतेचे टेमघर धरण बांधण्यात आले. २०१५ ला धरणातून गळती होत असल्याचे समोर आले. धरणात पाणीसाठा असताना दुरुस्ती शक्य नसल्याने धरणातील पाणी खडकवासला धरणात सोडून गळती प्रतिबंधक कामे सन २०१७ मध्ये हाती घेण्यात आली. या कामांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात ड्रिलिंग, ग्राऊटिंग या पद्धतीने धरण दुरुस्तीचे काम करण्यात आले. धरण दुरुस्तीचे हे दोन्ही टप्पे पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यात धरणाच्या आतील बाजूस सिमेंटच्या आच्छादीकरणाचे काम अर्धवट अवस्थेतच राहिले आहे. करोनाची दोन वर्षे आणि त्यानंतर धरणाच्या दुरुस्तीस निधी न मिळाल्याने हे काम पूर्ण होऊ शकले नाही. टेमघर धरणाची उंची ८६ मीटर, तर लांबी १०७५ मीटर आहे. या भागात सिमेंट आच्छादीकरण केले जाणार आहे.

टेमघर गळती प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत प्रकल्पावर काम करणारे संस्थेचे शास्त्रज्ञ राज्याच्या जलसंपदा विभागाच्या संपर्कात आहेत. उर्वरित गळती रोखण्यासाठी संस्थेची काही मदत लागल्यास उपाययोजना करण्यात येईल. डाॅ. प्रभातचंद्र, संचालक, सीडब्ल्यूपीआरएस