scorecardresearch

निष्काळजीपणामुळेच इमारत दुर्घटना ; चौकशी समितीचा निष्कर्ष

या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती.

पुणे : येरवडय़ातील इमारतीचा स्लॅब कोसळून झालेला अपघात हा निष्काळजीपणामुळेच झाल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालात नोंदवला आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी नियुक्त दहा सदस्यीय समितीने त्याबाबतचा अहवाल सादर केला आहे. लोखंडी सळईच्या जाळय़ांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेत योग्य नियंत्रण, समन्वय नव्हते तसेच या कामामध्ये निष्काळजीपणा केल्याचे आढळून आले, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

येरवडय़ातील शास्त्रीनगर येथील ब्लू ग्रास बिझनेस पार्क या व्यावसायिक संकुलाचा स्लॅब कोसळून पाच मजुरांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने दुर्घटनेची वस्तुस्थिती मांडली आहे. इमारतीच्या राफ्ट फाउंडेशनबाबतची बांधकाम कार्यपद्धती सदोष होती. लोखंडी जाळीची ठेवणी आणि बांधणी योग्य प्रकारे करण्यात आली नव्हती. जाळय़ांची बांधणी आणि उभारणी इमारतीच्या स्थापत्य आराखडय़ानुसार होणे आवश्यक होते. मात्र तसे न करता जाळय़ा टाकण्यात आल्या. योग्य तांत्रिक तपासणीही करण्यात आली नाही. इमारत बांधकामाच्या ठिकाणी संरक्षक कठडे बांधण्यात आले नाहीत, असा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे. पोलीस, नगररचना विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, क्रेडाई आणि कामगार कल्याण कार्यालयाचे प्रतिनिधी, मुख्य अग्निशमन अधिकारी, संरचना अभियंता, वास्तुविशारद, महापालिकेच्या बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांचा या चौकशी समितीमध्ये समावेश आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयालाही या दुर्घटनेबाबत तांत्रिक अभ्यास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Slab of a building in yerawada collapsed due to negligence inquiry committee report zws