स्मार्ट सिटी अभियानात नागरिकांचा सहभाग घेतला जात असतानाच अनेक लोकप्रतिनिधींनीही या अभियानात सक्रिय सहभाग घेतला असून स्मार्ट सिटीसाठी शहराचा आराखडा तयार होण्यापूर्वीच उपमहापौर आबा बागूल यांनी त्यांच्या प्रभागाचा स्मार्ट आराखडा तयार करून घेतला आहे. प्रभागातील नागरिकांना सर्व सेवा-सुविधा स्मार्ट पद्धतीने कशा प्रकारे देता येतील असे स्वरुप असलेल्या या आराखडय़ाचे सादरीकरण बुधवारी (२३ सप्टेंबर) आयुक्तांसमोर होणार आहे.
केंद्र शासनाने देशातील ९८ शहरांची निवड स्मार्ट सिटी अभियानासाठी केली असून दरवर्षी २० शहरांना या अभियानात प्रत्यक्ष सहभागी करून घेतले जाणार आहे. या अभियानात पुणे शहराची निवड पहिल्या वर्षी व्हावी यासाठी महापालिकेकडून सध्या शहरात अनेकविध प्रयत्न सुरू आहेत. शहरात कोणत्या सुधारणा प्राधान्याने व्हायला पाहिजेत याबाबत नागरिकांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत. त्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षणही सुरू आहे. या प्रयत्नांबरोबरच लोकप्रतिनिधींनीही काही योजना तयार केल्या असून त्यांचाही उपयोग शहराच्या विकासासाठी होणार आहे.
उपमहापौर आबा बागूल यांनी त्यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक ६७ चा स्मार्ट आराखडा तज्ज्ञांकडून करून घेतला आहे. स्मार्ट सिटी अभियानाच्या माध्यमातून महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा-सुविधा नागरिकांना स्मार्ट तंत्राचा अवलंब करून देण्याची योजना या आराखडय़ात मांडण्यात आली आहे. संपूर्ण प्रभागातील लोकसंख्येचा व भौगोलिक विचार करून हा आराखडा तयार करण्यात आला असून नागरिकांना विविध सेवा देण्यासाठी वेगवेगळे अॅप तयार करण्याची योजना या आराखडय़ात मांडण्यात आली आहे. पाणीपुरवठा, रस्ते दुरुस्ती, वीज पुरवठा आदी सुविधांबाबत नागरिकांना या अॅपद्वारे संबंधितांकडे तक्रार नोंदवता येईल. तसेच प्रभागातील शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असताना कोणत्या शाळेत किती प्रवेश झाले आहेत, किती जागा शिल्लक आहेत अशा स्वरुपाची विविध क्षेत्रातील उपयुक्त माहिती देणारे अॅपही तयार करण्याचीही योजना आराखडय़ात प्रस्तावित करण्यात आली आहे. प्रभागातील रस्ते आदर्श रस्ते कशा पद्धतीने करता येतील, मोकळ्या जागांचा उपयोग महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी कशाप्रकारे करता येईल, आदर्श बस थांबे कशा पद्धतीने उभे करता येतील, सौरऊर्जेचा वापर कशा पद्धतीने करता येईल आदी अनेक बाबींचा विचार या आराखडय़ात करण्यात आला आहे.

स्मार्ट सिटी अभियानासाठी केंद्र सरकराने जे निकष ठरवून दिले आहेत त्यांचा विचार करून प्रभाग ६७ चा स्मार्ट आराखडा तयार केला आहे. हा आराखडा विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना दाखवला जाणार आहे. तज्ज्ञांच्या तसेच नागरिकांच्या सल्ला व सूचनांनुसार या प्रस्तावित आराखडय़ात काही बदल करून वा काही गोष्टींची वाढ करून संपूर्ण शहरासाठी देखील असा आराखडा तयार करणे शक्य आहे.
उपमहापौर आबा बागूल