पुणे: कापड वाहतुकीच्या नावाखाली प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सिगारेटची तस्करी होत असल्याचा प्रकार गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईने उघडकीस आला आहे. प्रतिबंधित गुटख्यासह टेम्पो, कंटेनर असा सुमारे एक कोटी १३ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, फुरसुंगी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. ऊरूळी देवाची येथील मंतरवाडी फाट्यावर ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी वाहनचालक आजिनाथ बबन धुमाळ (वय ३१, रा. केशवनगर, मांजरी बुद्रुक) आणि मदनसिंग चित्तो राम (वय ३८, रा. जम्मू काश्मीर) यांना अटक करण्यात आली आहे. तर, राधेशाम बाबुलाल वर्मा (रा. मंतरवाडी), मिथुन नवले (रा. गणेश पेठ), दौलतराम जांगिड (रा. मंतरवाडी) आणि निखिल अगरवाल (महाराष्ट्र फ्राईट कॅरिअर्स प्रा. लि. व चंद्राई वेअर हाऊस या गोदामाचे मालक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस हवालदार पृथ्वीराज किसन पांडुळे यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंतरवाडी-कात्रज रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कपड्यांची गोदामे आहेत. व्यापारी गुजरात तसेच राजस्थानमधून कापड आणून या ठिकाणी ठेवतात. मात्र, कापड विक्रीच्या नावाखाली प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सिगारेटची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी (१९ मे) साडेसहाच्या सुमारास मंतरवाडी-कात्रज रस्त्यावर ऊरूळी देवाची येथील एका हॉटेलमागे छापा टाकून प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याची वाहतूक करणारा चालक धुमाळ याला टेम्पोसह ताब्यात घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर एक कंटेनर चालक मदनसिंग याला ताब्यात घेतले. पोलिसांनी जवळच्या चंद्राई वेअर हाऊस या गोदामामध्ये छापा टाकून तेथे साठा केलेला गुटखा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी दोन चालक, वाहनांचे मालक तसेच गोदामाचे व्यवस्थापक आणि मालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एक कोटी १३ लाख ७२ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.