पुणे : काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल, या समाजमाध्यमात प्रसिद्ध झालेल्या वाक्याचा संदर्भ घेत काँग्रेसने भारतीय जनता पक्षाच्या सत्ताकाळातील कारभाराचे वाभाडे काढले आहेत. काय ते रस्त्यावरचे खड्डे, काय ती घरपट्टी वाढ, काय ती पाणीपट्टीत वाढ आणि काय ती स्मार्ट सिटी, काय तो कोट्यवधींची घोटाळा…एकदम ओके असा मजकूर असलेले उपरोधिक फलक शहराच्या काही भागात उभारण्यात आले आहेत. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे यांनी उभारलेल्या या फलकाची सध्या चर्चा सुरू आहे.
भारतीय जनता पक्षाची २०१७ ते २०२२ या कालावधीत सत्ता होती. मात्र सत्ताकाळात भारतीय जनता पक्षाला शहर विकासाला गती देता आली नसल्याचा आरोप भाजप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. त्याचा संदर्भ घेत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे यांनी भाजपच्या कारभाराची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला आहे. काय ते रस्त्यावरचे खड्डे. काय ती घरपट्टीत वाढ. काय ती पाणीपट्टीत वाढ. काय ती स्मार्ट सिटी. काय तो कोट्यवधींचा घोटाळा. एकदम ओके! असा मजकूर या फलकांवर उभारण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाने पाच वर्षात केवळ गैरव्यवहार केल्याचा आरोप संजय बालगुडे यांनी केला आहे. या फलकांची सध्या चर्चा सुरू आहे.