पुणे : दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाने आईवर चाकूने वार केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले वसाहतीत घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पर्वती पोलिसांनी मुलाला अटक केली.
कौशल्या पप्पू कांबळे (वय ५५, रा. सावित्रीबाई फुले वसाहत, सिंहगड रस्ता) असे गंभीर जखमी झालेल्याचे महिलेचे नाव आहे. या प्रकणी कौशल्या यांचा मुलगा कृष्णा (वय ३०) याला अटक करण्यात आली. याबाबत कृष्णाचा मोठा भाऊ बाबासाहेब (वय ३६) याने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा कांबळे याला दारु पिण्याचे व्यसन आहे. तो काही कामधंदा करत नाही. तो दारू पिण्यासाठी सतत पैशांची मागणी करून आईला त्रास देत होता. पैसे न दिल्याने त्याने आईला शिवीगाळ केली. गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास त्याने आई कौशल्या यांच्यावर चाकूने वार केले. चाकूने छातीमध्ये भोसकले. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेल्या कृष्णा याला पोलिसांनी अटक केली. पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.
वैमनस्यातून टोळक्याकडून एकावर हल्ला
वैमनस्यातून टोळक्याने एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना लोहगाव भागात घडली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भाऊसाहेब गोपीनाथ राखपसरे (वय ४८, रा. मोझे आळी, लोहगाव) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी नितीन सकट, निकेश पाटील, गणेश सखाराम राखपसरे, ओंकार उर्फ खंड्या खांडे यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब राखपसरे यांची आरोपींशी भांडणे झाली होती. राखपसरे यांनी दिलेल्या तक्रारीमुळे आरोपींविरुद्ध पोलिसांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली होती. या कारणावरुन नितीन, निकेश, गणेश, ओंकार आणि साथीदार चिडले होते. आरोपींनी १३ ऑगस्ट राेजी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांच्यावर लोहगाव भागात हल्ला केला. त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन आरोपी पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक सचिन धामणे तपास करत आहेत. पसार झालेल्या आरोपींचा माग काढण्यात येत आहे. शहरात किरकोळ वादातून खुनाचा प्रयत्न, खून अशा घटना वाढीस लागल्या आहेत. किरकोळ वादातून कात्रज भागात एका तरुणाचा खून झाल्याची घटना नुकतीच घडली होती.