लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : ढोलताशांचे, ध्वनिवर्धकांच्या भिंती यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादांचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदा लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत सरासरी १०१.३ डेसिबल ध्वनिपातळीची नोंद झाली. त्यातही रात्री आठ वाजता खंडूजीबाबा चौकात तब्बल १२९ डेसिबल ध्वनिपातळी नोंदवली गेली.
सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या उपयोजित विज्ञान आणि मानव्यविज्ञान विभागातर्फे विसर्जन मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषणाची मोजणी करण्यात आली. यंदा या उपक्रमाचे २३वे वर्ष होते. डॉ. महेश शिंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे नियोजन जयवंत नांदोडे आणि इशिता हुमणाबादकर यांनी केले. सुयोग लोखंडे, इंद्रजीत देशमुख, पार्थ धोटे, रणदिग्विजय जाधव, अथर्व डांगे, आदित्य संजीवी, आनंद पाणजकर, तेजस जोशी, शार्दुल लोकापुरे, शितीज राजपूत या विद्यार्थ्यांनी नोंदी घेतल्या. इरा कुलकर्णी, सात्विका उदयकुमार, समृद्धी तागडे, गायत्री ठकार, पद्मेश कुलकर्णी, नागेश पवार यांनी आकडेवारीचे विश्लेषण केले.
आणखी वाचा-VIDEO: दगडूशेठ गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीने गणेशोत्सवात घालून दिला आदर्श
केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या निकषांनुसार दिवसा निवासी क्षेत्रात ५५ डेसिबल, औद्योगिक क्षेत्रात ७५ डेसिबल, रात्री निवासी क्षेत्रात ४५ डेसिबल, औद्योगिक क्षेत्रात ७० डेसिबल ध्वनिपातळी असणे अपेक्षित आहे. विसर्जन मिरवणुकीच्या उत्साहात या मर्यादा गणेश मंडळे, ढोलताशा पथके, ध्वनिवर्धकांकडून सरळ धुडकावल्या गेल्याचे आकडेवारीवरून सिद्ध होते. गेल्यावर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्यावर सरासरी १०५ डेसिबल ध्वनिपातळी नोंदवली गेली होती. त्या तुलनेत यंदा किचिंत घट झाली. मात्र नोंदवली गेलेली ध्वनिपातळी आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते.