पुणे : ‘कल्याणीनगर अपघात प्रकरणात ससून रुग्णलायातील डॉ. अजय तावरे याने निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज केला आहे. या अर्जावर मंगळवारी (२० मे) सुनावणी होणार आहे. अशा प्रकारचे अर्ज खटल्याची सुनावणी लांबविण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत,’ असे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी स्पष्ट केले.
‘या प्रकरणातील आरोपी आदित्य सूद याने शिवाजीनगर न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर १९ मे रोजी सुनावणी होणार आहे. दोन्ही अर्जांवरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आरोप निश्चितीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे,’ असे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.
‘हा खटला जलदगतीने चालविण्यासाठी सरकार पक्षाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. साक्षीदारांची यादी, तसेच अन्य न्यायालयीन प्रक्रियेबाबतची कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत. आरोपनिश्चिती करण्यात येऊ नये, तसेच जामिनासह निर्दोष मुक्ततेसाठी वेगवेगळे अर्ज करून खटला लांबविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या अर्जांवरही सरकार पक्षाकडून म्हणणे मांडण्यात येणार आहे,’ असे हिरे यांनी नमूद केले.
अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला सज्ञान ठरविण्यात यावे, याकरिता त्याच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी बाल न्याय मंडळात अर्ज सादर केला आहे. या अर्जावर जून महिन्यात सुनावणी होणार आहे.