पुणे: मुंबई- बंगळुरू महामार्गालगत राबविण्यात येणाऱ्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला काही संस्थांनी विरोध दर्शवला आहे. या संदर्भात काळाखडक रहिवासी संघातर्फे त्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबत वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोल्हटकर यांना निवेदन दिल आहे. शेकडो रहिवासी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. अपना वतन संस्थेचे संस्थापक सिद्दिक शेख यांच्यावर वेगवेगळे आरोप करत रहिवाशांनी ही मागणी केली आहे. झोपडपट्टी धारकांची पुनर्वसन प्रकल्पास मान्यता आहे. तरीही सिद्धीक शेख हे नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सिद्दिक शेख जबाबदार असतील असा आरोप रहिवाशांनी केला आहे.
मुंबई- बंगळुरु महामार्गालगत काळा खडक या ठिकाणी एस.आर.ए म्हणजेच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात येत आहे. (इमारत उभारण्यात येणार आहेत.) त्या ठिकाणच्या नागरिकांचा यासाठी विरोध नाही. याचा तेथील नागरिकांना फायदा होणार आहे. तिथं राहत असलेल्या नागरिकांना ३०० चौरस फुटांचा हक्काचा फ्लॅट मिळणार आहे. या प्रकल्पाला रहिवाशांचा पाठिंबा आहे. तरीदेखील काही व्यक्ती नागरिकांमध्ये संभ्रम व्यक्त करत आहेत. रहिवाशांनी हा प्रकल्प रद्द करावा यासाठी प्रोत्साहित केलं जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो? हे लक्षात घेऊन काळा खडक झोपडपट्टी रहिवासी संघातर्फे वाकड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत याबाबत निवेदन देण्यात आले आहे. सिद्दिक शेख यांचा या प्रकल्पाशी काही संबंध नाही. ते काळा खडक येथील रहिवाशी नाहीत.
आणखी वाचा-पिंपरी : बचत गटातील महिलांनी साकारला ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा देखावा
काळाखडक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील प्राथमिक पात्रता यादीत २ सप्टेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध झाली. याबाबत शेख यांनी चुकीची माहिती देऊन, ही यादी बोगस असल्याची अफवा पसरून स्थानिक झोपडपट्टी धारकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनाला बोगस बोलणाऱ्या शेख यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. प्रकल्पाबाबत बोगस आणि मृत झालेल्या व्यक्तींच्या सह्यांचे पत्र वेगवेगळ्या शासकीय कार्यालयामध्ये जमा केले आहे. याबाबत झोपडपट्टी धारकांनी पोलिसात धाव घेऊन तक्रारी अर्ज केला आहे. त्यामुळे या तक्रारीवरून योग्य तो तपास करून सिद्दिक शेख यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
“त्या प्रकल्पाला तेथील काही नागरिकांचा विरोध आहे. सर्व्हे आणि प्रकल्प रद्द होण्याबाबत लढाई लढत आहे. मृत आणि बोगस सह्या मी घेतलेल्या नाहीत. याबाबत कायदेशीर लढाई लढणार.” -सिद्धीक शेख- अपना वतन संस्थापक