पाकिस्तानच्या सिंध प्रांतात आलेला महापूर आणि अन्य स्थानिक परिस्थितीमुळे कांद्याचे दर प्रचंड वाढले आहे. भारतातून कांदा व टोमॅटोची आयात करण्याची मागणी होत आहे. भारताने तातडीने निर्यात सुरू करून भारतातील कांदा व टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी पंतप्रधान मोदी आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवून केली आहे.पाकिस्तानात अतिवृष्टी व महापुरांमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी पाकिस्तानात कांद्याचे दर ४०० रुपये प्रति किलो (पाकिस्तानी रुपया) व टोमॅटोचे दर ५०० रुपये झाले आहेत व ७०० पाकिस्तांनी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानातील व्यापारी वर्ग, भारतातून कांदा व टोमॅटो आयात करण्याची मागणी पाकिस्तान सरकारकडे करत आहेत.
हेही वाचा >>> पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला २२ लाखांचा गंडा
भारतात कांदा आणि टोमॅटोचे दर पडले आहेत. उत्पादन खर्च पेक्षाही कमी दर आहेत. कांदा चाळींमध्ये सडतो आहे व टोमॅटो रस्त्यावर फेकले जात आहेत. अशा परिस्थितीत भारताने पाकिस्तानला कांदा व टोमॅटो निर्यात करण्याचा निर्णय घ्यावा, जेणेकरून देशातील शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल, अशी मागणी भारतातील शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे, असे अनिल घनवट म्हणाले.
हेही वाचा >>> पुणे पोलिसांची भारत- पाक सामन्यादरम्यान मोठी कारवाई! लाखो रुपयांचा सट्टा लावणारा पबमधून अटकेत; मोबाइल, रोकड जप्त
भारतात कांदा व साखरेचे दर नियंत्रित करण्यासाठी अनेक वेळा भारताने पाकिस्तानातून कांदा व साखरेची आयात केली आहे. कारगीलच्या युद्धाच्या दरम्यानही मोठ्या प्रमाणात साखरेची आयात करण्यात आली होती. भारताने पाकिस्तानला मदत करण्याचा हेतूने नव्हे तर भारतातील कांदा व टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निर्यात सुरू करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी व वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना सोमवारी रोजी पत्र पाठवून कांदा व टोमॅटो निर्यात तातडीने सुरू करण्याची विनंती, केली आहे, अशी माहितीही स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली आहे.