पुणे : सूक्ष्म व लघु उद्योजकांना व्यवसाय उभारणीत येणाऱ्या अडचणींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी लघुउद्योजक प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा १३ जूनला शिवाजीनगरमधील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजच्या भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर सभागृहात होणार आहे. शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि दे आसरा फाउंडेशन यांच्या वतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील सूक्ष्म व लघु उद्योजकांना उद्योग व्यवसायात येणाऱ्या अडचणींबाबत या मेळाव्यात मार्गदर्शन केले जाईल. त्यात उद्योगासाठी भांडवल उभारणीचे विविध प्रकार, कर्ज प्रस्ताव, कर्ज प्रक्रिया यांची माहिती देण्यात येईल. व्यवसाय कसा उभारावा आणि त्याची ओळख कशी निर्माण करावी, व्यवसायाची आर्थिक स्थिती कशी सुधारावी याबाबत तज्ज्ञांकडून लघुउद्योजकांना माहिती देण्यात येईल. तरुण व्यावसायिक व उद्योजकांना तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शन मिळावे, यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यात हा उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्यातील प्रशिक्षण कार्यक्रम १३ जूनला सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. यात पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील लघु व सूक्ष्म उद्योजक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लघुउद्योजकांनी https://forms.gle/1mTU5sJnruXWxPhz8 या लिंकवर नोंदणी करावी अथवा जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्राशी दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१३३६०६ येथे संपर्क साधावा, अशी माहिती सहाय्यक आयुक्त सा. बा. मोहिते यांनी दिली.