पुणे : धर्मादाय रुग्णालयांच्या विरोधात सातत्याने राज्य सरकारकडे तक्रारी येत होत्या. रुग्णांकडे अनामत रक्कम मागणे, पैशांअभावी उपचार नाकारणे, निर्धन रुग्ण निधीचा वापर न करणे अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर सरकारने धर्मादाय रुग्णालयांसाठी नवी नियमावली जाहीर केली असून, या रुग्णालयांना अनामत रक्कम स्वीकारण्यावर निर्बंध घातले आहेत. मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी ईश्वरी (तनिषा) भिसे या गर्भवतीस उपचार नाकारल्याने तिचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. याप्रकरणी राज्य सरकारने धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या समितीने चौकशी करून काही दिवसांपूर्वी राज्य सरकारला अहवाल सादर केला. या अहवालातील शिफारशींच्या आधारे राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागाने धर्मादाय रुग्णालयांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे.
या नियमावलीत म्हटले आहे, की निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांसाठीच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व धर्मादाय रुग्णालयांना धर्मादाय आयुक्तांनी सूचना द्याव्यात. निर्धन रुग्ण निधी शिल्लक नसल्याच्या कारणामुळे उपचारांपासून वंचित राहू नये, यासाठी राज्यातील सर्व धर्मादाय रुग्णालयांनी सर्व सरकारी आरोग्य योजना लागू कराव्यात. त्यात महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांसह आरोग्याशी संबंधित सर्व सरकारी योजनांचा समावेश आहे.
धर्मादाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांवरील नियोजित उपचार अथवा शस्त्रक्रियेकरिता उपलब्ध करून देण्यासाठी धर्मादाय रुग्णालयांनी ऑनलाइन प्रणालीद्वारे मंत्रालयातील धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची पूर्वमान्यता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीमध्ये या योजनेंतर्गत धर्मादाय रुग्णालयांनी प्रथम संबंधित रुग्ण दाखल करून घेऊन उपचार करावेत. त्यानंतर ऑनलाइन प्रणालीवर नोंद घेऊन पुढील ४८ तासांत प्रस्ताव मान्यतेसाठी पाठवावा, असे नियमावलीत म्हटले आहे.
धर्मादाय रुग्णालयांकडील निर्धन रुग्ण निधीची अद्ययावत माहिती धर्मादाय आयुक्तांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी. धर्मादाय रुग्णालयाने रुग्णाकडून अवाजवी पद्धतीने अनामत रक्कम स्वीकारण्यावर निर्बंध टाकण्यात येत आहेत. यापुढे अनामत रकमेअभावी धर्मादाय रुग्णालयामध्ये रुग्णास उपचार नाकारले जाणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी. धर्मादाय रुग्णालयामध्ये कोणत्याही आपत्कालीन स्थितीतील रुग्णांवर प्राधान्याने उपचार करावेत. आपत्कालीन स्थितीमध्ये गर्भवती महिलांवरील उपचारांचाही समावेश आहे. निर्धन व दुर्बल घटकांमधील रुग्णांवर उपचारांसाठी शासनाने निर्देशित केलेल्या कागदपत्रांव्यतिरिक्त अन्य कागदपत्रांची मागणी करू नये, असेही नियमावलीत नमूद करण्यात आले आहे.
रुग्णालयांचे उत्पन्नाचे इतर स्रोतही रडारवर
अनेक धर्मादाय रुग्णालयांनी औषधविक्री, रोगनिदान चाचण्या बाह्यस्रोतांकडे हस्तांतरित केलेल्या आहेत. यामुळे रुग्णालयांचे एकूण महसुली उत्पन्न कमी होते आणि त्याचा परिणाम निर्धन रुग्ण निधीमध्ये जमा होणाऱ्या रकमेवर होतो. त्यामुळे अशा सुविधा रुग्णालयाने बाह्यस्रोतांकडे हस्तांतरित केलेल्या असल्या, तरी त्यांच्या एकूण वार्षिक महसुली उत्पन्नातील दोन टक्के रक्कम निर्धन रुग्ण निधीमध्ये वर्ग करावी, असेही नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे.
धर्मादाय रुग्णालयांच्या नव्या नियमावलीत काय?
रुग्णांकडून अनामत रक्कम मागण्यावर निर्बंध
शासनाने निर्देशित केलेल्या कागदपत्रांव्यतिरिक्त इतर कागदपत्रे रुग्णाकडे मागण्यास मनाई
सर्व सरकारी योजना लागू करणे बंधनकारक
आपत्कालीन स्थितीत रुग्णावर उपचारास प्राधान्य
आरक्षित खाटांची मंत्रालयातील धर्मादाय रुग्णालय मदत कक्षात नोंद
निर्धन रुग्ण निधीची माहिती धर्मादाय आयुक्तांच्या संकेतस्थळावर