पुणे : आपत्कालीन वैद्यकीय सेवेंतर्गत १०८ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांना तातडीची मदत मिळते. आता या सेवेंतर्गत अत्याधुनिक १ हजार ७५६ रुग्णवाहिका राज्याला मिळणार आहेत. या रुग्णवाहिका प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज असणार आहेत. याची अंमलबजावणी येत्या नोव्हेंबरपासून होणार आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाबरोबर सुमीत एसएसजी बीव्हीजी महाराष्ट्र ईएमएस या कंपनीने १० वर्षांचा करार केला आहे.

राज्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील रुग्णांना तत्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी १०८ रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली. आता या माध्यमातून अत्याधुनिक रुग्णवाहिकांच्या माध्यमातून अद्ययावत सेवा प्रदान केली जाणार आहे. या रुग्णवाहिकेमध्ये डॉक्टर आणि निम्नवैद्यकीय कर्मचारीही असणार आहेत. हा नवीन १०८ रुग्णवाहिका कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे. यात भागीदार संस्था १ हजार ७५६ अत्याधुनिक रुग्णवाहिका तैनात करणार आहे. आपत्कालीन प्रसंगी रुग्णांना तातडीची काळजी आणि उपचार या रुग्णवाहिकेमध्ये मिळेल. त्यात प्राणवायू सुविधा, अत्याधुनिक स्ट्रेचर आणि हृदयविकारासंदर्भातील उपकरणे असतील.

या नवीन १०८ प्रकल्पाचा प्रारंभ राज्यात पाच टप्प्यांत होणार असून, त्याची अंमलबजावणी नोव्हेंबरपासून सुरू होईल. यासाठी सुमारे १ हजार ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या अत्याधुनिक रुग्णवाहिका या वेगवेगळ्या प्रकारच्या असणार आहेत. त्यात बेसिक लाइफ सपोर्ट, ॲडव्हान्स्ड लाइफ सपोर्ट, निओनॅटल केअर युनिट या प्रकारच्या रुग्णवाहिकांसोबत दुचाकी रुग्णवाहिका, बोट रुग्णवाहिकांचा समावेश असेल. त्याचबरोबर भविष्यात आपत्कालीन सेवेसाठी ड्रोन आणि हेलिकॉप्टरचा वापर करण्याचाही विचार सुरू आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

नवीन अत्याधुनिक रुग्णवाहिका

मोबाइल डेटा टर्मिनल – रुग्णाची माहिती रुग्णवाहिकेतून थेट रुग्णालयाला पाठविणारी यंत्रणा

वैद्यकीय टॅबलेट – अत्याधुनिक वैद्यकीय तपासणीसाठी संगणकीय उपकरण

आरएफआयडी, जीपीएस – रुग्णवाहिकेचे नेमके ठिकाण दाखविणारी यंत्रणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ट्रायएज सिस्टीम – रुग्णाच्या स्थितीनुसार उपचाराची तीव्रता दर्शविणारी यंत्रणा