पिंपरी : वैष्णवी हगवणे हिचा सासरकडून हुंड्यासाठी होणारा छळ आणि मृत्यू या संवेदनशील विषयाबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना आरोपींच्या वकिलांकडून वैष्णवीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आरोप करण्यात आल्यानंतर याची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. आयोगाने याबाबत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र ॲण्ड गोवा यांना पत्र पाठवून अशा प्रकरणांमध्ये वकिलांसाठी सुस्पष्ट आणि नीतीसंगत नियमावली करण्याची सूचना केली आहे.

आरोपी हगवणे कुटुंबाचे वकील विपूल दुशिंग यांनी न्यायालयात वैष्णवीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आरोप केले. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी बार कौन्सिलला पत्र दिले आहे. वैष्णवी हगवणे हिचा सासरकडून हुंड्यासाठी होणारा छळ आणि मृत्यू या अतिशय संवेदनशील विषयाबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. असे असताना आरोपींच्या वकिलांकडून माध्यमांमध्ये वैष्णवीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आरोप केले जात आहेत. वकिलांना जे काही सादर करायचे आहे, ते त्यांनी न्यायालयात पुराव्यानिशी सादर करावे. त्यांच्या वक्तव्यामुळे पीडितेची प्रतिमा मलीन होत आहे. यामुळे तिच्या कुटुंबीयांना मानसिक, भावनिक त्रासास सामोरे जावे लागत असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समाज म्हणून वैष्णवी हिला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. न्याय मिळण्याच्या प्रक्रियेदरम्यान माध्यमातून होणारे असे चारित्र्यहनन चुकीचे असून, मनोबल खच्ची करणारे आहे. वकिलांनी समाजातील एक जबाबदार घटक म्हणून अधिक सजग राहून पीडितेच्या प्रतिष्ठेची व गोपनीयतेची काळजी घेणे अपेक्षित आहे. भविष्यात अशा प्रकारांना आळा बसावा, यासाठी गांभीर्याने विचार व्हावा. वकिलांसाठी सुस्पष्ट व नीतीसंगत नियमावली ठरवावी, असेही पत्रात म्हटले आहे.