पुणे : ‘बालभारती’ची मुख्य इमारत अत्यंत कमकुवत झाल्यामुळे तातडीने पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशात विधान परिषदेत सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी पुणे येथील बालभारती कार्यालयाची इमारत जुनी झाल्याने नवीन इमारत बांधण्यासंदर्भात लक्षवेधीद्वारे प्रश्न विचारला होता. त्यास राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी उत्तर दिले. या संदर्भात झालेल्या चर्चेत सदस्य जगन्नाथ अभ्यंकर, विक्रम काळे, किशोर दराडे यांनी सहभाग घेतला.राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले, ‘बालभारतीची स्थापना २७ जानेवारी १९६७ रोजी झाली.

इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शासनमान्य अभ्यासक्रमाची पुस्तके याच ठिकाणी छापून संपूर्ण महाराष्ट्रभर वितरित केली जातात. सध्या अस्तित्वात असलेली इमारत लोड बेअरिंग स्ट्रक्चरमध्ये बांधण्यात आलेली आहे. या इमारतीच्या स्थापत्य लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) अहवालानुसार या इमारतीच्या जागी नवीन इमारत बांधणे आवश्यक आहे. त्यामुळे ही इमारत नव्याने बांधण्यासाठी लवकरच नियामक मंडळापुढे प्रस्ताव मांडून मान्यता घेतली जाईल. मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू केले जाईल.’

‘राज्यभरातील वापरलेली पुस्तके आणि वह्या गोळा करून त्यांचा पुनर्वापर केला जाईल. त्यातून नवीन वह्या व पुस्तके विद्यार्थ्यांना कमी दरात उपलब्ध होतील. तसेच, बालभारतीच्या मालकीच्या जागा असलेल्या ठिकाणी आवश्यक पायाभूत सुविधा उभ्या करण्याचा सरकारचा प्रयत्न राहील,’ असेही डॉ. भोयर यांनी सांगितले.

‘स्थानिक गरजांनुसार अभ्यासक्रमाची निर्मिती’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘एससीईआरटी’ आणि ‘एनसीईआरटी’ अभ्यासक्रमासंबंधी विचारलेल्या प्रश्नांना राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी उत्तर दिले. त्यानुसार राज्य शासनाच्या धोरणानुसार स्थानिक गरजांनुसार अभ्यासक्रम तयार केला जाईल. तसेच बालभारतीने तयार केलेल्या कृतिपत्रिकांचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले.