पुणे : नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्यात (एनआयआरएफ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या झालेल्या घसरणीचे तीव्र पडसाद उमटले आहेत. विद्यापीठाच्या घसरणीची जबाबदारी स्वीकारून कुलगुरू, व्यवस्थापन परिषद, अधिसभा सदस्यांनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशभरातील शिक्षण संस्थांची एनआयआरएफ क्रमवारी जाहीर केली. त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची घसरण झाली. गेल्या वर्षी सावित्रीबाई फुले पुणे सर्वसाधारण गटात ३७व्या, विद्यापीठ गटात २३व्या, तर राज्य विद्यापीठांच्या गटात तिसऱ्या स्थानी होते. मात्र, यंदाच्या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सर्वसाधारण गटात ९१व्या, विद्यापीठ गटात ५६व्या, राज्य विद्यापीठांच्या गटात ११व्या स्थानी फेकले गेले आहे. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी झालेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतही क्रमवारीत झालेल्या घसरणीबाबत चर्चा झाली.

बैठकीपूर्वी विद्यापीठ विद्यार्थी कृती संघर्ष समितीसह विविध संघटनांनी आंदोलन केले. त्यानंतर व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. त्यात विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला वसतिगृह मिळावे, पीएचडी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळाची चौकशी करावी, विद्यापीठातील प्रभारी राज संपवण्यात यावे यासह एनआरआरएफ क्रमवारीत झालेल्या घसरणीची नैतिक जबाबदारी घेऊन कुलगुरूंनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली.

समितीचे प्रतिनिधी राहुल ससाणे, रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे नितीन आंधळे, सूरज गायकवाड, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ओंकार बेनके, युवा सेनेचे गोरक्ष कांबळे, दलित पँथरचे रोहित भामरे, समाधान दुपारगुडे, मयूर जावळे उपस्थित होते.

विद्यापीठातील अधिकारी, अधिकार मंडळ सदस्यांनी एकत्रितपणे काम करून विद्यापीठाला पुढे नेणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. विद्यापीठाची क्रमवारीत झालेली घसरण लाजिरवाणी आहे. त्यामुळे व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्यांनी सामूहिक राजीनामा द्यावा, अशी मागणी युवा सेनेचे सहसचिव कल्पेश यादव यांनी केली.

‘एनआयआरएफ’ क्रमवारीत विद्यापीठाची घसरण झाली याबाबत चिंता वाटणे साहजिक आहे. मात्र, ही बाब अत्यंत गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. येत्या काळात सकारात्मक बदल दिसून येतील. – डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ