पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू झाले आहे. परीक्षांच्या निकालात त्रुटी असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी कॅरी ऑन लागू करण्याची मागणी केली आहे.
विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या परीक्षांचे निकाल नुकतेच परीक्षा व मूल्यमापन मंडळाने जाहीर केले. त्यातील अभियांत्रिकीच्या निकालात त्रुटी असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. त्यामुळे पुनर्परीक्षा, कॅरी ऑनच्या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी आंदोलन करण्यात आले होते.
त्यानंतर आता पुन्हा विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेऊन एकत्र येत विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर आंदोलन सुरू केले असून, विद्यार्थ्यांकडून घोषणाबाजी करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यापीठात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
एनएसयूआयचे अक्षय जैन यांनी सांगितले, एकूण गुणांच्या केवळ कहा टक्केच गुण ग्रेस म्हणून दिले जातात, तर ५० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी पाच गुण ग्रेस मिळाले पाहिजेत. मात्र, एका विद्यार्थिनीला ११ गुण ग्रेस देऊन उत्तीर्ण करण्यात आले आहे.
अशा विविध मुद्द्यांवर परीक्षा विभागाच्या कारभाराविरोधात विद्यार्थी विद्यापीठात आंदोलन करत आहेत. कॅरी ऑन लागू करावा अशी प्रमुख मागणी आहे.
दरम्यान, उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले ५० टक्के श्रेयांक विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले नाहीत. त्यामुळे नियमानुसार विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले आहेत. विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेले असले, तरी नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे परीक्षा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी स्पष्ट केले.