पुणे : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांसाठी विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया मंगळवारपासून (१४ जानेवारी) सुरू करण्यात येत आहे. राज्यभरातील १ लाख ८ हजारांपेक्षा अधिक जागा प्रवेशासाठी उपलब्ध असून, पालकांना १४ ते २७ जानेवारी या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.

प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. आरटीईअंतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये पहिली ते आठवीचे शिक्षण मोफत दिले जाते. या विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्काची प्रतिपूर्ती शिक्षण विभागाकडून शाळांना करण्यात येते. यंदा प्रवेश प्रक्रियेसाठी १८ डिसेंबरपासून शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ३१ डिसेंबरपर्यंत अपेक्षित नोंदणी न झाल्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शाळा नोंदणीसाठी ४ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यानंतर प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया कधीपासून सुरू होणार याकडे पालकांचे लक्ष लागले होते.

हेही वाचा…‘यूजीसी-नेट’ परीक्षा लांबणीवर, एनटीएचा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरटीई पोर्टलवरील आकडेवारीनुसार राज्यभरातील ८ हजार ८४९ शाळांनी प्रवेश प्रक्रियेत सहभाग नोंदवला आहे. या शाळांमध्ये प्रवेशासाठी एकूण १ लाख ८ हजार ९६१ जागा उपलब्ध झाल्या आहेत. आरटीई प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी सर्वाधिक जागा पुणे जिल्ह्यात उपलब्ध असतात. यंदाही पुणे जिल्ह्यातील ९५१ शाळांची नोंदणी झाली आहे. त्यात १८ हजार ४५१ जागा प्रवेशासाठी उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे.