पुणे : मागील काही काळापासून तापमानात अचानक बदल होत आहे. तापमानातील तीव्र चढउताराचा परिणाम आरोग्यावर होत आहे. श्वसनविकाराचे रुग्ण वाढले असून, त्यांच्यामध्ये प्रामुख्याने सर्दी, खोकला आणि श्वसनाचा त्रास होणे ही लक्षणे दिसून येत आहे. अशा रुग्णांनी वेळीच औषधोपचार घ्यावेत, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिला आहे.

तापमानातील बदलामुळे आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण होत आहेत. तापमानात अचानक होणारे बदल रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकतात. त्यामुळे सर्दी आणि श्वसनमार्ग संसर्ग होण्याची शक्यता वाढते. आधीच दमा आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज (सीओपीडी) असलेल्या व्यक्तींना तापमानात अचानक झालेल्या बदलांमुळे अतिरिक्त गुंतागुंत होऊ शकते. या फरकांमुळे धाप लागणे, खोकला आणि घरघर वाटणे यांसारखी लक्षणे उद्भवू शकतात. श्वसनविकार असलेल्या रुग्णांनी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे, असे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले.

हेही वाचा…स्थानिक उद्योगांना जागतिक व्यापाराची संधी! मराठा चेंबरच्या वतीने ‘पुणे इंटरनॅशनल बिझनेस समिट’चे आयोजन

तापमानातील चढ-उतारामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवरही परिणाम होतो. थंड तापमानाच्या संपर्कात आल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, रक्तदाब वाढतो आणि हृदयावर जास्त ताण येतो. आधीपासून हृदयविकार असलेल्या रुग्णांसाठी हे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे रक्तदाबाचे निरीक्षण करणे आणि छातीत दुखणे, धाप लागणे यासारखी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे, असे आरोग्यतज्ज्ञांनी स्पष्ट केले.

आपल्या त्वचेला तापमानातील फरकाचा त्रास होऊ शकतो. त्वचा कोरडी होऊन खडबडीत होऊ शकते. वेगवेगळ्या हवामानात भरपूर पाणी पिणे, मॉइश्चरायझर वापरणे आणि त्वचेचे योग्य संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. याचबरोबर तापमानात अचानक होणारा बदल केवळ शारीरिक नव्हे, तर भावनिक आरोग्यावरही परिणाम करू शकतो. ऋतुबदलादरम्यान सूर्यप्रकाशाचा अभावही आपल्या मनावर नकारात्मक परिणाम करू शकतो, असे आरोग्यतज्ज्ञांनी नमूद केले.

हेही वाचा…पुणे : लष्करी सरावादरम्यान कोथरुडमध्ये सदनिकेच्या खिडकीवर बंदुकीची गोळी

तापमान बदलामुळे होणाऱ्या समस्या

सर्दी व श्वसनास त्रास होणे
श्वसनमार्ग संसर्ग
हृदय व रक्तवाहिन्यांवर परिणाम
त्वचा कोरडी पडणे
मानसिक आरोग्यावर परिणाम

हेही वाचा…पुणे अग्निशमन दलात प्रथमच महिला फायरमनची निवड…वाचा मेघना महेंद्र सपकाळ हिची कहाणी

ऋतू संक्रमणावेळी हवामानात होणाऱ्या बदलाचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. तापमानात अचानक बदल होत असताना बाहेरील वातावरणाच्या संपर्कात येताना काळजी घ्यायला हवी. विशेषत: श्वसनविकाराच्या रुग्णांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.– डॉ. अक्षय धामणे, डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी

मागील काही दिवसांत तापमानात अचानक वाढ झाल्याने ॲलर्जीमुळे उद्भवणारे श्वसनविकार वाढल्याचे दिसत आहे. उन्हाचा पारा वाढल्याने पुरेसे पाणी पिण्यासोबत बाहेर जाताना योग्य काळजी घ्यायला हवी. वाढत्या प्रदूषणामुळेही श्वसनविकाराचे रुग्ण वाढत आहेत. – डॉ. संजय गायकवाड, ससून सर्वोपचार रुग्णालय