ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचे मत
सद्य:स्थितीत अनेक सूत्रसंचालक गृहपाठ न करताच मुलाखती घेतात. कला, सामाजिक, राजकीय, आर्थिक किंवा सांस्कृतिक क्षेत्रात योगदान दिलेल्या मान्यवरांनी संपूर्ण आयुष्य त्या क्षेत्रात खर्ची घातलेले असते अशांची मुलाखत कोणताही गृहपाठ न करता घेण्याचे प्रमाण वाढलेले आहे. नव्या पिढीच्या सूत्रसंचालकांचा अभ्यास कमी पडतो, असे मत ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांनी शनिवारी व्यक्त केले.
बासरीवादक अजित सोमण यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘स्वरशब्दप्रभू पुरस्कार’ मंगेशकर यांच्या हस्ते प्रसिद्ध निवेदक आणि ललित लेखक सुधीर गाडगीळ यांना प्रदान करण्यात आला, त्या वेळी मंगेशकर बोलत होत्या. अनुराधा सोमण, भाग्यश्री सोमण-गढवाल, प्रकाश भोंडे या वेळी उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील विद्यार्थिनी गायिका माधवी केळकर यांना पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
मंगेशकर म्हणाल्या,‘ मुलाखतकारास किंवा कार्यक्रमाचे निवेदन करणाऱ्यास कार्यक्रम किंवा मुलाखत जिवंत करता आली पाहिजे. समोरच्याला बोलतं करण्याची कला त्याच्याकडे पाहिजे. अशा काही मोजक्या अभ्यासू मुलाखतकारांमध्ये सुधीर गाडगीळ यांचा समावेश होतो. गाडगीळांचे व्यक्तिमत्त्व हे प्रसन्न आहे, तजेलदार आहे, हसतमुख आहे; त्यामुळे ते व्यासपीठावरील ताण हलके करतात. त्यांचे सूत्रसंचालन समतोल साधणारे असते. तसेच वेळ पडली तर प्रेक्षकांच्या लक्षात न येता ते कठीण प्रसंगही सांभाळून घेतात.’
गाडगीळ म्हणाले,‘ जवळपास सर्वच ललित कलांमध्ये भरभरुन रमण्याचा सोमण यांचा स्वभाव होता. वेळी-अवेळी जाऊन त्याच्याकडून हक्काने काम करुन घेताना आम्हाला कधीही संकोच वाटला नाही, इतका तो जवळचा होता. संगीत, जाहिरात, शिक्षण आणि साहित्य अशा विविध क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करुन सोमण याने त्याचा ठसा उमटविला होता.’ या वेळी गाडगीळ यांनी त्यांच्या वाटचालीत दूरदर्शन, आकाशवाणी आणि मुद्रित माध्यमांचा देखील सिंहाचा वाटा असल्याचे नम्रपणे नमूद केले. तसेच, आगामी काळात माईकवरुन संवाद साधण्यापेक्षा लिखाणावर भर देणार असल्याचा मानस व्यक्त केला. गाठीशी असलेल्या अनुभवाची शिदोरी पुस्तकरूपाने मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी या वेळी
सांगितले. सूत्रसंचालन अरुण नूलकर, तर गुणवर्धन सोमण यांनी आभार मानले.