गरम, गरम आणि ताजे पदार्थ हे ‘सुगरण’चं वैशिष्टय़ं. एखादा पदार्थ दिवसभर किती लागेल याचा विचार करून तो तेवढा तयार करून ठेवला आणि ग्राहकांना दिला असा प्रकार इथे नाही. जशी मागणी येते तसे पदार्थ बनत असतात. त्यामुळे इथे चवीचा आनंद घेता येतो.

हॉटेलमध्ये जाऊनही सात्विक, चविष्ट आणि घरगुती चवीचे खाद्यपदार्थ खायचे असतील किंवा जेवण करायचं असेल तर एक चांगलं ठिकाण शहरात अगदी मध्यवर्ती भागात आहे. या ठिकाणाचं नाव ‘सुगरण.’ नारायण पेठेत केळकर रस्त्यावर केसरी वाडय़ाच्या शेजारी असलेलं ‘सुगरण’ पूर्वी ज्यांनी बघितलेलं आहे त्यांना नव्या स्वरूपात आणि नव्या दिमाखात सुरू झालेल्या ‘सुगरण’मध्ये खूप बदल झाल्याचं जाणवतं. या केंद्राचं स्वरूप बदललेलं असलं तरी घरगुती चव जशी पूर्वी होती तशीच आजही आहे आणि हेच इथलं खास वैशिष्टय़ं.

Dombivli Crime News
डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक
MPSC Announces General Merit List, Police Sub Inspector Cadre , Relief to Candidates, mpsc announced merit list, mpsc, maharashtra news, government exam, police, police officer, marathi news, students, MPSC
एमपीएससीकडून २०२१च्या ‘पीएसआय’ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
Sanjay Raut
मराठी माणूस व एकीकरण समितीत फूट पाडण्याचे भाजपचे कारस्थान – संजय राऊत
Loksatta Lokrang Maharashtra Foundation is recognized in Maharashtra for awards in literary and social fields
पंचम देणे सामाजिक जाणिवेचे !

गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी, त्यांना थोडं साहाय्य व्हावं या उद्देशानं (कै.) इंदुताई टिळक यांनी १९९० च्या सुमारास हे महिला पुनर्वसन केंद्र सुरू केलं. त्या केंद्राच्या ‘सुगरण’ने अल्पावधीतच चांगला जम बसवला. हे केंद्र सुरू झालं त्यावेळी तिथे प्रामुख्यानं तयार खाद्यपदार्थ विकले जात असत. चिवडा किंवा तशा स्वरूपाचे पदार्थ तेव्हा तेथे मिळत. पोळी-भाजी मिळण्याचं अगदी घरगुती केंद्र असंही स्वरूप त्याला प्राप्त आलं. हे केंद्र चार वर्षांपूर्वी नव्या, मोठय़ा जागेत सुरू झालं आणि त्याचं रूप एकदम बदललं. ‘सुगरण’ला आता एका चांगल्या हॉटेलचं रूप देण्यात आलं आहे. इथली स्वच्छता आणि ग्राहकांना दिली जाणारी जलद सेवा येणाऱ्या प्रत्येकाच्या कौतुकाचा विषय ठरते. शिवाय, इथे मिळणाऱ्या सर्व पदार्थाचे दरही अत्यंत वाजवी असेच ठेवण्यात आले आहेत.

खास महाराष्ट्रीय पद्धतीने तयार केलेले आणि मराठी चवीचे पदार्थ ही ‘सुगरण’ची खासियत. ‘खास महाराष्ट्रीयन चवीकरिता’ अशी पाटी आपल्याला ‘सुगरण’च्या दारातच दिसते. चवीची ही खासियत प्रत्येक पदार्थाच्या चवीत जपली जाते. अर्थात अन्य गावांमधून, प्रांतांमधून शिक्षणासाठी आलेला तरुण वर्ग लक्षात घेऊन, त्यांच्या मागणीनुसार तवा पुलाव किंवा मिसळ असेही दोन-तीन चमचमीत पदार्थ इथे दिले जातात. इतर सगळे पदार्थ खास घरगुती चवीचे. मुकुंद भागवत हे या केंद्राचं व्यवस्थापन बघतात. या क्षेत्रातला त्यांचा अनुभव चाळीस वर्षांचा आहे. केटरिंग हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय. वडील दत्तात्रय भागवत हा व्यवसाय करत होते. गरवारे महाविद्यालयात शिकत असतानाच मुकुंद यांनी व्यवसायात कामाला सुरुवात केली आणि त्यातून खूप अनुभव त्यांना मिळाला. टिळक स्मारक मंदिरातील उपाहारगृह ते गेली चाळीस र्वष चालवत आहेत.

इथे मिळणारी किंचित कमी तिखट पण चटकदार मिसळ असेल किंवा चविष्ट बटाटे वडा असेल.. प्रत्येक पदार्थाची चव दाद मिळावी अशीच असते. इथली साबूदाणा खिचडीदेखील प्रसिद्ध आहे आणि खिचडी काकडी ही डिशही भरपूर खपाची आहे. मिसळ, दही मिसळ यांच्या जोडीला पोहे, उपमा, इडली सांबार, बटाटे वडा चटणी, बटाटे वडा सांबार असे नाश्त्याचे पदार्थ इथे मिळतात. सकाळी अकरानंतर इथे गर्दी सुरू होते ती जेवायला येणाऱ्यांची. ही गर्दी दुपारी तीनपर्यंत कायम असते. जेवायला आलेल्यांचे पहिले लक्ष जाते ते समोरच्या भिंतीवर. कारण तेथे आजचा मेनू म्हणजे मुख्यत: त्या दिवशीच्या भाज्या, उसळी यांची माहिती लिहिलेली असते. भाज्या, उसळी रोज बदलत्या असल्यामुळे आल्याआल्या आधी आपल्या आवडीची भाजी निवडायची आणि मग ऑर्डर द्यायची हा इथे येणाऱ्यांचा शिरस्ता. ज्यांना जेवण करायचं असतं, त्यांच्यासाठी इथे साठ रुपयांत राईस प्लेट दिली जाते. त्यात तीन पोळ्या, डाळ-भात आणि आवडीनुसार दोन भाज्या हे पदार्थ असतात. फक्त पोळी-भाजी घेतली तर तीन पोळ्या आणि दोन भाज्या येतात. या शिवाय इथली पिठलं भाकरी प्रसिद्ध आहे. तसंच मटकी-भाकरी, वांग-भाकरी यांचाही ऑप्शन आहे. वेगवेगळ्या प्रकारचे गरम गरम पराठेही इथे मिळतात. आणखी दोन लोकप्रिय डिशची ओळख करून द्यावीच लागेल. कढी- खिचडी आणि तवा पुलाव. मुगाच्या डाळीची खिचडी आणि मराठी चवीची कढी या डिशला इथे खूप मागणी असते. सोबत पापड, लोणचं वगैरेही असतंच. हे सगळे पदार्थ इथे रोज दिवसभर मिळतात. इथली पुरण पोळी, गुळाची पोळी असे वैशिष्टय़पूर्ण पदार्थही अनेकांना आवडतात.

‘सुगरण’मध्ये कोणताही पदार्थ दिवसभरासाठी एकदाच करून ठेवला असं केलं जात नाही. जसजसे पदार्थ लागतात, ऑर्डर येते तसे ते बनवले जातात. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येकाला ताजा आणि गरम पदार्थ मिळतो. पोळ्या, पराठे हे तर थेट तव्यावरून आपल्या ताटात येतात. त्यामुळे ताजे, गरम पदार्थ आणि त्याला घरगुती चवीची जोड.. खवय्याला आणखी काय हवं..

सुगरण

कुठे : नारायण पेठेत, केळकर रस्त्यावर ‘केसरी वाडय़ा’शेजारी

केव्हा : रोज सकाळी आठ ते रात्री दहा, रविवारी दुपारनंतर बंद