एमआयटी महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखेमध्ये बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने पौड रस्त्यावरील ब्रिलियंट सोसायटीतील शिकवणीवर्गाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली. या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
सौरभ शामराव भरेकर (वय १७, रा. कोथरूड) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. पौड रस्त्यावरील पी. जोग इंग्लिश स्कूल समोर असलेल्या ब्रिलियंट सोसायटीतील दीपा पाठक केमेस्ट्री क्लास या शिकवणीवर्गामध्ये सकाळच्या तुकडीमध्ये तो जात होता. या शिकवणीवर्गाला तो नियमित येत होता. सोमवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास सौरभच्या वडिलांनी दुचाकीवरून त्याला शिकवणीवर्गाच्या इमारतीजवळ सोडले. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर शिकवणी आहे, मात्र सौरभ तेथे गेलाच नाही. त्यामुळे शिकवणी वर्गात त्याची गैरहजेरी लावण्यात आली. सौरभ थेट इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील गच्चीवर गेला व तेथून त्याने खाली उडी मारली.
शिकवणी वर्गाच्या या इमारतीसमोर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे निवासस्थान आहे. तेथे बंदोबस्तासाठी असलेले पोलीस कर्मचारी विनोद सोनवणे यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सौरभला तातडीने पौड रस्त्यावरील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच सौरभचा मृत्यू झाला होता. सौरभच्या जवळ कोणतीही चिठ्ठी मिळाली नाही. त्यामुळे या आत्महत्येमागे कोणते कारण होते, ते अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. पोलिसांकडून याबाबतचा तपास करण्यात येत आहे.

दहावीत ९५ टक्के गुण मिळविणारा सौरभ!

आत्महत्या केलेला सौरभ भरेकर हा अत्यंत शांत स्वभावाचा व हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. दहावीच्या परीक्षेमध्ये त्याने तब्बल ९५ टक्के गुण मिळविले होते. भरेकर कुटुंबीयांना तो एकुलता एक मुलगा होता. शिकवणी वर्ग व महाविद्यालयामध्ये त्याचे अनेक मित्रही होते. त्याच्या मृत्यूची घटना समजताच मित्रांनाही शोक अनावर झाला. सौरभच्या कुटुंबीयांसाठी तर आकाशच फाटले!