पुणे : कात्रज भागात महिलेसह एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. बरखा मंडल (वय ३२, सध्या रा. सीताश्री निवास, कात्रज बसस्टाॅपमागे, संतोषनगर), राजू फारुख शेख अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. बरखा आणि राजू मूळचे पश्चिम बंगालमधील आहेत. पंधरा दिवसांपूर्वी दोघेजण कात्रज भागात राहायला आले होते. संतोषनगरमध्ये त्यांनी भाडेतत्वावर खोली घेतली होती. रविवारी (२५ डिसेंबर) सायंकाळी बरखा आणि राजूने गळफास घेऊन आत्महत्या केली.

रहिवाशांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. दोघांच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. पोलिसांनी मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी रात्री उशीरा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली.