पुणे : मानव आणि प्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी वन्यजीव कायद्यात सुधारणा, तसेच पावसाळ्यात सह्याद्री रांगांच्या परिसरातील दरड कोसळू नये, याबाबत उपाययोजना करण्यासाठी ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्याची आणि त्यांच्या अहवालानुसार कार्यवाही करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. याबाबतचे पत्र त्यांनी ई-मेलद्वारे पाठवले आहे.

‘महाराष्ट्रातील वन्यजीव संरक्षण कायद्यात काळानुसार बदल करणे व सह्याद्री रांगांच्या परिसरातील दरडी कोसळणे यावर उपाय योजना करण्याबाबत या भेटीत आपण गाडगीळ यांच्याशी चर्चा केली. वेगाने होणारे शहरीकरण, जंगलांचा होणारा ऱ्हास, शेती पद्धतीत होणारे बदल, वन्यजीवांच्या संख्येतील प्रादेशिक चढउतार यामुळे मानव आणि जंगली प्राणी यांच्यातील संघर्ष वाढत असल्याचे गाडगीळ यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘अनेकदा जंगली प्राणी मानवी वस्तीत येऊन मानव, तसेच पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. मात्र, वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ मुळे आपण जंगली प्राण्यांना इजा पोहचवू शकत नाही. केरळने या कायद्यात सुधारणा करण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. मानव आणि जंगली प्राणी दोघेही त्यांच्या अधिवासात सुरक्षित राहतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी या कायद्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. या समस्या सोडवण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमणे आवश्यक आहे,’ अशी विनंती माने यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.