विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे शिवसेना पुरस्कृत कार्यक्रमासाठी चिंचवडला येणार होते. वेळेत पोहोचतो असा निरोप देणारे तावडे प्रत्यक्षात आलेच नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेकडून भाजपवर कुरघोडीचा प्रयत्न होत आहे. तावडेंच्या हजेरीमुळे त्यास पाठबळ दिल्याचे चित्र निर्माण होईल, अशी भीती भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे व्यक्त केली. अखेर, बऱ्याच नाटय़मय घडामोडी व मुंडे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर तावडे यांनी त्या कार्यक्रमाला ‘दांडी’ मारली.
लोकसभा निवडणूक होण्यापूर्वीच पिंपरीत विधानसभा निवडणुकीवरून शहराचे राजकारण तापू लागले आहे. भाजपच्या वाटणीला असलेल्या िपपरी मतदारसंघावर शिवसेनेच्या एका गटाचा डोळा आहे. त्याचाच एक भाग म्हणून शक्तिप्रदर्शनाच्या हेतूने ‘बाबर सेने’ ने चिंचवडला एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्याकरिता तावडे यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले व त्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना शब्द टाकण्यास सांगण्यात आले. तावडे येणार असल्याचे जाहीर झाल्यापासून शहर भाजपमध्ये अस्वस्थता होती. ते आल्यास वेगळा संदेश जाईल, अशी धास्ती मुंडे समर्थक पदाधिकाऱ्यांना होती. त्यामुळे तावडे तेथे आल्यास आपण बहिष्कार टाकू, अशी भूमिका या गटाने घेतली. मुंडे यांच्याशी संपर्क साधून येथील परिस्थिती त्यांच्या कानावर घालण्यात आली. त्यांनी तावडेंशी चर्चा केली, त्यामुळे तावडेंनी िपपरीत येण्याचा निर्णय रहित केला. दुसरीकडे, ते यावेत म्हणून पक्षातील तावडे समर्थकांनी शेवटच्या क्षणापर्यंत आटापिटा केला. तथापि, तावडेंनी त्या कालावधीत त्यांचे फोन स्वीकारले नाहीत. आपल्याला स्थानिक राजकारणाची काही माहिती नाही. सेना नेत्यांनी विनंती केल्यामुळे आपण या कार्यक्रमाला येणार होतो, असा युक्तिवाद तावडे यांच्याकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
कार्यकारिणीचा घोळ कायम
िपपरी भाजपची शहर कार्यकारिणी दोन दिवसात जाहीर होईल, अशी ग्वाही भाजप नेते दर दोन दिवसांनी देत आहेत. मात्र, अंतर्गत वाद व कुरघोडीच्या राजकारणामुळे कोणतेही नाव अद्याप निश्चित होऊ शकलेले नाही. युवा मोर्चा अध्यक्ष, महिला अध्यक्ष, सरचिटणीस अशा महत्त्वाच्या पदासाठी तीव्र रस्सीखेच आहे.