राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केले होते. त्यानंतर विरोधकांकडून फडणवीसांवर जोरदार टीका करण्यात येत आहे. दरम्यान, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही देवेंद्र फडणवीसांवर टीकास्र सोडले आहे. पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री राहिलेली व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुलेंचा अवमान करण्याऱ्यांची पाठराखण करते, हे दुदैवी आहे, असे त्या म्हणाल्या. त्य पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांना प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

“राज्यापालांनी शिवाजी महाराजांबाबत केल्या विधानावरून काल महाविकास आघाडीकडून संपूर्ण राज्यभरात निदर्शने करण्यात आली. यावरून राज्यातील नागरिकांच्या मनात अस्वस्थता आणि नाराजी आहे. ज्यांनी पाच वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले, अशी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुलेंचा अपमान करण्याऱ्यांची पाठराखण करते, हे दुदैवी आहे, हे पाप आजचे ‘ईडी’ सरकार करते आहे”, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

नेमकं काय म्हणाले होते फडणवीस?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे समर्थन केले होते. “राज्यपालांच्या बोलण्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात आले आहेत. पण मला असं वाटतं की त्यांच्याही मनात असा कुठलाही भाव नाही. छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा दुसरा कुठला आदर्श महाराष्ट्रात आणि देशात असू शकत नाही”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी यांनी दिली होती.